हॉटेलच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडून एका आठ वर्षे वयाच्या मुलीचा मृत्यू झाला. ताथवडे येथील हॉटेल अमृत आईस्क्रिम पार्लरजवळ ही घटना घडली. हिंजवडी पोलिसांनी या घटनेचा तपास करून हॉटेल चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साक्षी मारुती आलाकुंटे (रा. काळा खडक वसाहत, वाकड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी साक्षीची आई ललिता मारुती आलाकुंटे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलचालक गुणेश पुखाजी चौधरी (रा. ताथवडे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता आलाकुंटे या दोन महिन्यांपासून संबंधित हॉटेलमध्ये कामास आहेत. १० एप्रिलला त्यांची मुलगी साक्षी ही त्यांच्यासोबत आली होती. ती हॉटेलच्या परिसरात खेळत होती. ललिता यांचे काम संपल्यानंतर त्यांनी साक्षीचा शोध घेतला. मात्र, ती कोठेही दिसली नाही. हॉटेलमधील कामगारांनी हॉटेलच्या परिसरात सर्वत्र तिचा शोध घेतला. काही वेळाने साक्षी सांडपाण्याच्या खड्डय़ात मृत अवस्थेत सापडली.
हॉटेलमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेल्या या खड्डय़ास कोणत्याही प्रकारची संरक्षक भिंत घातली नव्हती. त्यामुळे हा हॉटेलचालकाचा निष्काळजीपणा असून, त्यामुळेच साक्षीचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.