पिंपरी चिंचवडच्या निगडी भागात वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी मागील ६ महिन्यांपासून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. तसेच निगडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

१६ वर्षांची मुलगी घरात एकटी असताना तिचा नराधम बाप तिच्यावर जबरदस्ती करत होता. तसेच याबाबत कोणालाही काही सांगशील तर तुला ठार करेन अशी धमकीही त्याने तिला दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलीच्या आईचा पाच वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर या मुलीचे वडिल, पीडित मुलगी आणि तिचा भाऊ असे कुटुंब होते. पीडित मुलगी १० वीत शिकते आहे.

मागील सहा महिन्यांपासून वडिलांकडून होणारे अत्याचार मुलगी जिवाच्या भीतीने सहन करत होती. मात्र तिने हा सगळा प्रकार अखेर तिच्या मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर मैत्रिणीने पीडित मुलीला ह्युमन राईट असोसिएशनकडे नेले. या ठिकाणी मुलीने सगळी माहिती त्यांना दिली. त्यानंतर या नराधम बापाला अटक करण्यात आली. हे कुटुंब मूळचे बंगालचे असल्याचेही समजते आहे.