पुणे : सर्वात तेजस्वी गॅमा किरणाच्या स्फोटाबद्दल पुण्यानजिकच्या खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपने (जीएमआरटी) घेतलेल्या निरीक्षणाच्या निष्कर्षांनी शास्त्रज्ञांच्या आजवरच्या गृहितकाला छेद गेला आहे. गॅमा किरण स्फोट तीनशे सेकंदापेक्षा जास्त टिकणे ही अपवादात्मक घटना असून, आता गॅमा किरण स्फोटासंदर्भातील संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे. राष्ट्रीय खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. उटाह विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ आणि प्रमुख संशोधक डॉ. तन्मय लास्कर, ॲरिझोना विद्यापीठाचे प्रा. डॉ. केट अलेक्झांडर, कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डॉ. राफेला मार्गुट्टी यांचा या संशोधनात सहभाग होता. भारतातील जीएमआरटीबरोबरच दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट अरे, अमेरिकेतील यूएस नॅशनल सायन्स फाऊंडेशनचे कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज अरे (व्हीएलए), चिलीमधील अटाकामा लार्ज मिलिमीटर अरे (एएलएमए) आणि हवाईमध्ये सबमिलीमीटर अरे (एसएमए) या दुर्बिणींचा वापर करण्यात आला. या संशोधनाचा शोधनिबंध ॲस्ट्रोफिजीकल जर्नल लेटरमध्ये प्रसिद्ध झाला. हेही वाचा. ‘एकच भूल कमळ का फुल, देशाला केले एप्रिल फूल’, राष्ट्रवादी काँग्रेसने कापला भाजपच्या खोट्या विकासाचा केक ऑक्टोबरच्या दुसऱ्या रविवारी (९ ऑक्टोबर) एक तीव्र गॅमा स्पंदन आपल्या सूर्यमालेला छेदून गेले आणि कृत्रिम उपग्रहांची कार्यक्षमता बाधित झाली. त्यामुळे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी या स्फोटाचा अभ्यास सुरू केला. जीआरबी २२१००९ए’ नावाचा हा नवीन स्रोत सुमारे तीनशे सेकंद टिकला. गॅमा किरण स्फोटांच्या इतिहासात हे सर्वात तेजस्वी उत्सर्जन होते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते असे दीर्घ कालावधीचे जीआरबी म्हणजे नवजात कृष्णविवराचा आवाज आहे. खादा विशाल तारा स्वतःच्या वस्तुमानाने स्वतःतच कोसळल्यावर त्याच्या गाभ्यामध्ये कृष्णविवर तयार होते. नवजात कृष्णविवराकडून जवळपास प्रकाशाच्या वेगाने सोडले जाणारे प्लाझ्माचे झोत कोसळणाऱ्या ताऱ्याच्या आवरणाला छेदून गॅमा किरणांमध्ये प्रकाशित होतात. मात्र, या तेजस्वी स्फोटाच्या संशोधनातून हाती आलेल्या निष्कर्षामुळे गॅमा किरण स्फोटाच्या अभ्यासाची दिशा बदलली आहे. हेही वाचा. लोणावळा: सिमेंट रस्ता खोदाईचा जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मारहाण झाले काय? स्फोट झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी सर्व प्रकारच्या दुर्बिणींद्वारे निरीक्षणे घेतली. त्यानंतर गॅमा किरणांच्या स्फोटानंतर काय होते याचा अभ्यास करण्यात आला. सर्वसाधारणपणे गॅमा किरणांचे हे झोत मरणासन्न ताऱ्याभोवतालच्या वायूमंडळात घुसतात, त्यावेळी एक प्रखर चमक (आफ्टरग्लो) तयार होऊन मंदावते. मात्र, जीएमआरटीद्वारे घेतलेल्या निरीक्षणातून रेडिओ लहरींची चमक अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकल्याचे दिसून आले. दृष्य प्रकाश आणि क्ष किरणांच्या आधारे काढण्यात आलेल्या अपेक्षित मोजमापांपेक्षा रेडिओ प्रकाशातील मोजमापे अधिक तेजस्वी होती. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या आजवरच्या गृहितकांना छेद गेला. हे अतिरिक्त उत्सर्जन नक्की कशामुळे झाले याचा अभ्यास खगोलशास्त्रज्ञांनी सुरू केला आहे.