आला आला चैत्र आला लिंब बहरून गेला

राजस लिंब गुढीवर झुले नाजूक साजूक लेऊन फुले

उन्हाची काहिली उन्हाची काहिली दारात लिंबाची राजस सावली।

कडूलिंबाला नववर्षांच्या आरंभास गुढीवर जागा देऊन त्याचे महत्त्व अधोरेखीत केले आहे. मेलीसी कुटुंबातील कडूलिंब कोरडय़ा हवेत, कमी पाण्याच्या कमी प्रतीच्या मातीतही चांगला येतो. कडूलिंबाचे झाड आता नाजूक पांढऱ्या फुलांनी डवरले आहे. जानेवारी, फेब्रुवारीत पानगळ झाल्यानंतर तांबूस पालवीने झाड नटते व नंतर सुंदर पोपटी पानांनी डवरते. पानांचा हिरवा रंग फारच मोहक, त्याच्यामुळे झाडाचे सौंदर्य खुलते.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

कडूलिंब खूपच गुणी वृक्ष आहे. याचे नाव अझाडीरेक्टा इंडिका. अस्सल भारतीय वृक्ष. कडूलिंबाच्या पानांचा रस अत्यंत कडू असला, तरी थंड प्रकृती थंड गुणाचा आहे. त्यामुळे पानांचे डहाळे फळांच्या टोपलीत खाली अंथरतात. पूर्वी पाने वाळवून तांदळात, वर्षभर टिकण्यासाठी कृमी न होण्यासाठी घालत असत. गोवर, कांजिण्या येऊन गेल्यावर कडूलिंबाची पाने पाण्यात उकळवून त्या पाण्यानी अंघोळ घातली जात असे. तांब्याच्या कळशीत पाणी ठेवून त्यात कडूलिंबाची पाने घालून सकाळी उन्हात ठेवली जात असे व दुपारी तापलेल्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ  ‘झळवणी’ घालत असत. यामुळे घामोळ्यासारखे त्वचेचे त्रास होत नसत.

कडूलिंबाच्या पानातील बुरशीनाशक गुणधर्मामुळे बागेसाठी हा कल्पवृक्ष आहे. तसेच कडूलिंबाची फळे म्हणजे लिंबोण्या. या बियांमध्ये मोठय़ा प्रमाणात तेलद्रव्य असते, प्रक्रिया करून हे तेल काढले जाते. त्यास ‘नीम तेल’ म्हणतात. नीम तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधने, साबण, औषधी उत्पादनांमध्ये केला जातो, प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक, कीटकरोधक म्हणून नीम तेल वापरले जाते. आपल्या बागेत महिन्यातून एकदा नीमतेलाची फवारणी करावी. याच्या उग्र वासाने शत्रूकीटक झाडांकडे येत नाहीत. असल्यास त्यांची वाढ होत नाही. अध्र्या लीटरच्या पंपामध्ये पाणी भरून त्यात दोन-तीन चहाचे चमचे नीमतेल घालून ८ ते १० तास ठेवावे. नंतर त्यात १ चमचा निरमा पावडर घालून, हलवून झाडावर फवारावे. नीम तेलाऐवजी कडूलिंबाच्या पानांचा अर्कसुद्धा वापरता येतो. पानांचा लगदा करावा. तो एक लिटर पाण्यात मिसळावा, रात्रभर तसाच ठेवून हे द्रावण गाळून घ्यावे व नंतर झाडांवर फवारावे.

झाडे जमिनीत असोत वा कुंडीत, झाडांच्या मातीत दोन महिन्यांमधून एकदा नीम पेंड वा नीम केक मिसळावे. लिंबोण्यांमधून तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या भुकटीस नीम पेंड म्हणतात. अतिशय उग्र वासाची, तपकिरी रंगाची ही भुकटी मातीचे आरोग्य राखते व आपल्या झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. मातीचे आरोग्य चांगले असेल तर झाडांवर रोगराई कमी येते, असा माझा अनुभव आहे. नर्सरीमध्ये नीम पेंड सहज मिळते. नीम पेंड वापरण्याने जमिनीतील सुप्रकृमी बुरशीजन्य किडी नष्ट होतात. अनेक शेतांमध्ये बांधांवर कडूलिंबाचे एखादे तरी झाड असते. पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी कडूलिंबाचे मोठाले वृक्ष दिसत. आज त्यांची जागा पेन्टोफोरम, कॅशिया, रेन-ट्री या झाडांनी घेतली आहे. ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही.

आपल्या लोकसाहित्यात, गीतांमध्ये कडूलिंबाचा उल्लेख आढळतो. कारण पूर्वी चिरेबंदी वाडय़ांबाहेर लिंब हमखास असणारच. आता आपण केवळ गुढीला लावण्यापुरती लिंबाची डहाळी आणतो अन् नंतर आरोग्यरक्षण करणाऱ्या लिंबाला विसरून जातो, पण –

‘निम्बती सिंच्चति स्वास्थम्।

न रिहम अशुभम् यस्यात् परित: भद्र यस्यात्। इति निम्बम्’

जो स्वास्थ वाढवतो, काही अरिष्ट, हानी करत नाही. ज्यापासून आपला फायदा होतो असा हा कडूलिंब प्रत्येकाच्या दारात हवाच. कडूलिंब हा आपलाच नाही तर आपल्या बागेचाही धन्वंतरी आहे. शिवाय आपल्या घरातील मुलांचा ‘चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?’ असे म्हणून या कडूलिंबाशी त्याची ओळख बाळपणीच आपण करून द्यायला हवी. त्यासाठी तरी एखादा कडूलिंब दारी हवाच।

प्रिया भिडे 

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]