स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या पुण्यात वाहने चालवणे अवघड बनले आहे. बेशिस्त वाहतूक आणि उखडलेले रस्ते-खड्डे यांच्या जोडीनेच आता भुयारी गटारांची झाकणे ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. ती एकतर रस्त्याच्या समतल पातळीत बसवलेली नाहीत, शिवाय ती खचल्यामुळे आणि त्यांच्या जाळ्या तुटल्यामुळे ही झाकणे अपघातांना निमंत्रण ठरत आहेत.
शहरातील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, कॅम्प आणि विविध पेठा यांमधील रस्त्यांची पाहणी केली असता सगळीकडे गटारांच्या झाकणांची अशीच स्थिती असल्याचे दिसून आले. महत्त्वाच्या रस्त्यांवर अशा तुटलेल्या झाकणांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांच्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहेत. महानगरपालिकेकडून बऱ्याचदा रस्ते दुरुस्तीचे काम केले जात असले, तरी या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येते. शहरातील बहुसंख्य ठिकाणी गटारांची झाकणे ही तुटलेली, कुठे रस्त्याच्या पातळीच्या खाली तर कुठे पातळीच्या वर गेलेली आहेत. यामुळे वाहने अशा झाकणांवरून गेली तरी आणि ही झाकणे चुकवण्याचा प्रयत्न केला तरी 7Chamber2अपघाताची भीती असल्याचे जागोजागी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे पाठीचे, मानेचे दुखणे असणाऱ्यांना ती अतिशय घातक ठरत आहेत.
रस्त्याची बांधणी घाईगडबडीत केल्यामुळे किंवा कमी दर्जाचे काम केल्यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्यावर वारंवार डांबराचा थर ओतला जातो, त्या वेळी या झाकणांना रस्त्याच्या पातळीवर आणण्याचे कष्ट ठेकेदाराकडून घेतले जात नाहीत. पालिकेचे अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रस्त्याच्या पातळीच्या खाली गेलेली झाकणे ही वाहनांच्या भाराने हळूहळू वाकतात आणि काही काळानंतर ते तुटतात. तसेच अशी तुटलेली किंवा वाकलेली झाकणे वेळेत बदलण्याची तसदीही प्रशासन घेताना दिसत नाही.

शास्त्री रस्त्यावर लोकमान्यनगर जवळ अशाच एका खचलेल्या झाकणात एका दुचाकी वाहनाचे चाक अडकल्याची घटना नुकतीच घडली. चाक अडकल्याने वाहनचालकाचा तोल गेला व मागून येणाऱ्या मोठय़ा वाहनाची त्याला धडक बसली. त्यात तो जखमी झाला. अशा घटना वारंवार घडत आहेत.
.
अंधाराच्या वेळेला ही झाकणे दिसत नसल्यामुळे अपघातांची भीती वाढते. झाकणे तुटली असल्यामुळे बरेचदा चोरीला जातात, त्यामुळे गटारे उघडी पडतात. ते अजूनच धोकादायक आहे.
– सुवर्णा सखदेव, सदाशिव पेठ

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अशी अवस्था झालेली आहे. ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच पुणेकरांची अवस्था होते. अशा झाकणांमुळे अपघात वाढत आहेत. परिस्थिती खरंच चिंताजनक आहे.
– प्रसेनजीत फडणवीस

पुण्यात महिला दुचाकी वाहन चालकांची संख्या जास्त आहे. मंडईतून भाजी आणण्यापासून ते मुलाला शाळेत सोडणे/ आणण्यापर्यंत महिलांची सगळी कामे दुचाकीवरच होतात. असे असताना गटारांच्या झाकणांमुळे मोठे अपघात होऊ शकतात. लहान मुले सोबत असताना जास्तच भीती वाटते. प्रशासनाने या बाबतीत काही केले पाहिजे.
– सायली थत्ते, सहकारनगर