सरकारी महाविद्यालयांत प्राथमिक सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास
खासगी महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव आढळल्यावर त्यांच्यावर डाफरणारे सरकार स्वत:च्या महाविद्यालयांच्या स्थितीबाबत मात्र डोळे मिटून बसले आहे. शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत अपंग विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सुविधाही नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांत अपंग विद्यार्थ्यांनाही वावरता येईल असे वातावरण, आवश्यक त्या सुविधा असाव्यात सरकारी नियम आहे. या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यालाही आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग आणि शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून न्यायालयाचा निर्णय आणि नियमाची आठवण राज्यातील महाविद्यालयांना करून दिली जाते; मात्र परिस्थिती जैसे थे आहे.
अनेक शासकीय तंत्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी अद्यापही काहीही सुविधा नाहीत. काही महाविद्यालयांमध्ये दाखवण्यापुरताच एखादा रॅम्प बांधण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश दाराजवळ रॅम्प असतो. पण महाविद्यालयाच्या इमारतीत अपंग विद्यार्थी वापरू शकतील अशी ‘लिफ्ट’ किंवा रॅम्प नसतो. त्याचप्रमाणे संपूर्ण महाविद्यालयाच्या आवारात एखादेच स्वच्छतागृह अपंग विद्यार्थ्यांसाठी योग्य असते.
पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयांतील (पॉलिटेक्निक) अपंग विद्यार्थ्यांना सुविधांच्या अभावी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या महाविद्यालयांची इमारत जुनी आहे. त्यामुळे तेथे रॅम्प बांधण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे लिफ्टची सुविधाही नाही. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा तळमजल्यावर नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना जिन्यानेच अगदी तिसऱ्या मजल्यापर्यंत चढ- उतार करावा लागत आहे. महाविद्यालयाचे वसतिगृह, खाणावळ येथेही विद्यार्थ्यांची अडचण होते आहे.

तंत्रशिक्षण महाविद्यालयांत एका विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. या विद्यार्थ्यांला कर्मचारी मदत करतात. महाविद्यालयाची इमारत जुनी आहे. त्यामुळे त्यात लिफ्ट किंवा रॅम्प नाही. त्याचप्रमाणे प्रयोगशाळाही तळमजल्यावर हलवणे शक्य नाही. शासकीय महाविद्यालयांमधील बांधकामे किंवा दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येते. तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या इमारतीत लिफ्ट बसवण्याबाबत विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
– डॉ. आर. डी. नंदनवार, विभागीय उपसंचालक, तंत्रशिक्षण विभाग