बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे महाविद्यालये आणि शाळांमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे मुख्याध्यापक, प्राचार्य अडचणीत आले आहेत.
बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे राज्यमंडळाकडून महाविद्यालयांमध्ये पाठवण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोहोचलेही आहेत. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळे महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांच्या डोक्याचा ताप आता अधिकच वाढला आहे.
एकीकडे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक तपासण्यासाठी उत्तरपत्रिका घेण्यास नकार देत आहेत. नियामकांच्या बैठका होऊन उत्तरपत्रिका तपासण्याबाबत पुढील सूचना परीक्षकांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये पोहोचलेल्या उत्तरपत्रिकांच्या गठ्ठय़ांची जबाबदारी सर्वस्वी प्राचार्यावर आहे. उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्टाने येत असल्यामुळे ते स्वीकारण्याशिवाय प्राचार्यासमोरही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे परीक्षक उत्तरपत्रिका स्वीकारेपर्यंत आलेले गठ्ठे सांभाळणे इतकेच प्राचार्याच्या हाती राहिले आहे. महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या परीक्षांची जबाबदारी, यातच आता उत्तरपत्रिकांच्या वाढणाऱ्या गठ्ठय़ाची जबाबदारी महाविद्यालयांवर आहे. बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे सुरक्षित ठेवता येतील अशा सुरक्षित आणि पुरेशा जागाही अनेक महाविद्यालयांमध्ये नाहीत. त्यामुळे परीक्षक जबाबदारी घेत नाहीत, तोपर्यंत उत्तरपत्रिका कशा सांभाळायच्या अशी नवी चिंता प्राचार्याना सतावत आहे. महाविद्यालयांच्या प्राचार्याची नियुक्ती ही विद्यापीठाने वरिष्ठ महाविद्यालयासाठी केलेली असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षांची जबाबदारी प्राचार्यानी का घ्यावी, असाही सूर प्राचार्यामध्ये उमटत आहे.