पुणे : शहर आणि परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे पोलीस आयुक्तालय आणि पत्रकार भवनसह एकूण ३० ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, शंभरहून अधिक वाहनांचे नुकसान झाले. शहर आणि परिसरात दुपारी तीननंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बंडगार्डन भागात पोलीस आयुक्तालयाजवळील झाड उन्मळून पडले. त्या भागात दुतर्फा दुचाकी वाहनांचे पार्किंग आहे. झाड कोसळल्याने त्याखाली पंचवीस दुचाकी सापडल्या. या घटनेची अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर पथक तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी कटरच्या साहाय्याने झाड कापून रस्ता रिकामा केला. कर्वे रस्त्यावर सह्याद्री रुग्णालयाच्या मागच्या बाजूची सीमाभिंत कोसळून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

पर्वती परिसरातील शाहू कॉलनी, भवानी पेठेतील बीएसएनएल कार्यालय, प्रभात रस्ता, औंध परिसरातील राजभवनाजवळील आंबेडकर चौक, गुरुवार पेठेतील पंचहौद मिशन, कोंढव्यातील शिवनेरीनगर, एमआयबीएम रस्ता, कात्रज कोंढवा रस्ता, नवी पेठेतील पत्रकार भवन, राजेंद्रनगर, स्वारगेटजवळील एसटी कॉलनी आणि कोंढव्यातील आनंदपुरा रुग्णालयाजवळील झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या.

या घटनांमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. एकाच वेळी अनेक ठिकाणी झाडे पडल्याची माहिती आल्याने अग्निशामक दलाची एकच धावपळ उडाली. मात्र, जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य राबविले. स्थानिक तरुणांनीही त्यांना मदत केली. त्यामुळे जलदगतीने झाडे दूर करण्यात जवानांना यश मिळाले.