पावसामुळे शहरात ६० ठिकाणी झाडे कोसळली;  सोसायटय़ांत पाणी शिरण्याच्या घटना; वाहनांचेही नुकसान

पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सोसाटय़ाचा वारा आणि पावसामुळे झाडांच्या फांद्या कोसळल्या, तसेच हडपसर, कोंढवा, टिंगरेनगर, लोहगाव, येरवडा भागातील काही सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले. दरम्यान, झाडांच्या फांद्या पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वाहनांचेही नुकसान झाले.

शहरात मंगळवारी (२ जून) सायंकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यानंतर बुधवारी सकाळपासून सोसाटय़ाचा वारा वाहण्यास सुरुवात झाली. मुसळधार पावसाच्या सरी थांबून थांबून पडत होत्या. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे वेगवेगळया भागात झाडांच्या फांद्या कोसळल्या.सकाळपासून पावसाचा जोर असल्याने शहरात फारशी गर्दी नव्हती. प्रतिबंधित भाग वगळता शहर तसेच उपनगरातील दुकाने उघडण्यात आली. मात्र, खरेदीसाठी फारशी गर्दी झाली नसल्याचे पाहायला मिळाले.

कोथरूड अग्निशमन केंद्रासमोर, भांडारकर रस्ता, शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता, आपटे रस्ता, विश्रांतवाडीतील कस्तुरबा हॉस्पिटल, स्वारगेट पोलीस वसाहत, विमाननगर, रामटेकडी, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक, पौड रस्त्यावरील उजवी भुसारी कॉलनी,  मुंढवा-केशवनगर, येरवडय़ातील वाडिया बंगला, मंगळवार पेठेतील मालधक्का चौक, कोरेगाव पार्क येथील गल्ली क्रमांक पाच, महापालिका वसाहत, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

येरवडा येथील गंगाराम कर्णे हॉस्पिटल, हडपसर येथील साडेसतरा नळी, ससाणेनगर, टिंगरेनगर, येरवडा येथील लक्ष्मीनगर, लोहगाव येथील डी. वाय. पाटील पार्कमागे, येरवडा येथील शांतीरक्षक सोसायटी, चंदननगर भागातील अग्रवाल हॉस्पिटलजवळ मोठय़ा प्रमाणावर पाणी साठले होते. ज्या भागात झाडे तसेच फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या,तेथे जवानांकडून झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला. सायंकाळपर्यंत झाडांच्या फांद्या हटविण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू होते.

वादळी वाऱ्यामुळे लोणावळ्यात शंभर झाडे पडली

भाजी मंडई, रेल्वे पादचारी पुलावरील पत्रे उडाले

लोणावळा : किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर लोणावळ्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. लोणावळा आणि खंडाळा परिसरात १०० हून जास्त ठिकाणी झाडे कोसळली. लोणावळा भाजी मंडईतील पत्रे वादळी वाऱ्यामुळे पडले तसेच काही घरांवरील पत्रेही पडले.

लोणावळा परिसरात मंगळवारी सायंकाळपासून पाऊस सुरू झाला. संततधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शहरातील वीज खंडित झाली. बुधवारी सकाळी पावसाचा जोर कायम राहिला. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपोलो गॅरेजसमोर, तुंगालर्ी चौक, नारायणी धाम, रायवूड पार्क भाग, सिद्धार्थनगर, हिलटॉप  खंडाळा, जुना खंडाळा, तुंगार्ली, भांगरवाडी, वळवण, नांगरगाव, अण्णा भाऊ साठे वसाहत, ठोंबरेवाडी, सिद्धार्थनगर भागात  झाडे पडली. डीसी शाळेजवळ  विजेचा खांब कोसळला. लोणावळा भाजी मंडईचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे पडले. बंगले, सोसायटय़ांच्या आवारात लावण्यात आलेले पत्रे पडले. लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी पुलावरील पत्रे वाऱ्यामुळे पडल्याची घटना घडली.

आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने तातडीने दहा पथके तयार केली आहेत. रस्त्यावर पडलेली झाडे, फांद्या जेसीबी यंत्राच्या सहाय्याने हटविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर भाजी मंडई आणि बाजार भाग बंद करण्यात आला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून लोणावळा शहरातील वीजपुरवठा  खंडित करण्यात आला.