पुणे शहरात अलीकडे वॉट्स अॅप, फेसबुक आणि ऑनलाईन एस्कॉर्टच्या जाहिरातीच्या माध्यमातून हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय तेजीत सुरू आहे. काही मोजक्या टोळ्यांकडून शहरात हा व्यवसाय चालविला जात असून महिन्याला कोटय़वधींची उलाढाल सुरू आहे. या व्यवसायावर कारवाई करण्यासाठी शहर गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये खास पथक असूनदेखील त्यांच्याकडून व स्थानिक पोलिसांकडून ‘अर्थपूर्ण’ गोष्टीमुळे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या टोळ्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही.
पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असून महत्त्वाचे माहिती तंत्रज्ञान केंद्र, शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. या ठिकाणी नोकरी करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. तसेच, शिक्षणासाठी देखील अनेक विद्यार्थी या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्यावर वेश्याव्यवसायातील टोळ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पुणे शहरात अजय पाटील, भरत कोल्हापुरे, अशा अनेक टोळ्यांकडून मुख्यत्वेकरून वेश्या व्यवसाय चालविला जातो. या सर्व टोळ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक टोळीकडे साधारण पाच ते दहा मोटारी असून त्याच्यामधून ग्राहकांना तरूणी पुरविल्या जातात. या टोळ्यांकडे साधारण दोनशे ते अडीचशे तरूणी असून त्यांच्यामार्फत वेश्या व्यवसाय करून घेतला जातो. काही वेळेस या तरूणींना ठरावीक रक्कम देऊन दहा-वीस दिवसांच्या क ॉन्ट्रॅक्टवर वेश्या व्यवसायासाठी बाहेरच्या राज्यातूनही बोलविले जाते, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
पुण्यात या टोळ्यांकडून वेश्याव्यवसायासाठी फेसबुक, वॉट्स अॅप आणि ऑनलाईन एस्कॉर्टच्या जाहिराती यांच्या माध्यमातून ग्राहक शोधले जातात. वॉट्अ अॅपवरून ग्राहकाला थेट तरूणींचे फोटे आणि त्यांचा दर पाठविला जातो. त्यानुसार ग्राहकाने निवड केलेली तरूणी त्याने सांगितलेल्या ठिकाणी पाठविली जाते. त्यासाठी या टोळ्यांकडून तरूणी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. तसेच, ऑनलाईन एस्कॉर्टच्या जाहिरातीवरून त्यांना ग्राहक मिळतात. त्यांच्या मागणीनुसार मोटारीतून त्यांना तरूणी पुरविल्या जातात. तसेच, फेसबुकवरून देखील वेश्या व्यवसायाला मोठय़ा प्रमाणात ग्राहक शोधले जातात. पुण्यात मुख्यत्वेकरून कोरेगाव पार्क, विमाननगर, खराडी, हिंजवडी परिसरात हा व्यवसाय तेजीत सुरू आहे. या ठिकाणी असलेले उच्चभ्रू ग्राहक हे या व्यवसायातील व्यक्तींचे लक्ष्य असतात. तर, कात्रज भागातही वेश्याव्यवसाय सुरू असून या ठिकाणी विद्यार्थी व आर्थिक दर्जा कमी असलेले ग्राहक त्यांना मिळतात. तसेच, देहूरोड, तळेगाव दाभाडे परिसरात देखील हा व्यवसाय तेजीत सुरू आहे. या सर्व गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी शहर गुन्हे अन्वेषण विभागामध्ये खास सामाजिक सुरक्षा विभाग तयार करण्यात आला आहे. पण, या विभागाला कुंटणखान्यातील वेश्या व्यवसाय दिसतो, मात्र हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाकडे अर्थपूर्ण गोष्टीमुळे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. या टोळ्यांकडून सर्वच ठिकाणी हात ओले केले जात असल्यामुळे त्यांना कारवाईची भीती राहात नाही, असेही या सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High profile prostitution
First published on: 27-05-2015 at 03:25 IST