सर्वाना सामावून व समजावून घेण्याची भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली होती. महाराष्ट्रातील सामान्य माणसाला उभारी देण्याची काम त्यांनी केले, अशी भावना विविध मान्यवरांनी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत व्यक्त केली.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश, विदर्भ हितकारणी संस्थांच्या वतीने या श्रद्धाजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड, माजी आमदार उल्हास पवार, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, आमदार विलास लांडे आदींनी मुंडे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
शेट्टी म्हणाले की, मुंडे यांनी महाराष्ट्राचा एक आदर्श संसदपटू म्हणून काम केले. चळवळीतील लोकांबद्दल त्यांना आस्था होती. विरोधी पक्षनेता कसा असावा, याचे ते उत्तम उदाहारण होते.
आव्हाड म्हणाले की, महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यात धडाडी होती. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याची मुंडे यांची भूमिका होती. स्वभावात धडाडी व झोकून देण्याची वृत्ती होती. त्यांच्या असण्याने आणखी काही महाराष्ट्राचे भले झाले असते.
उल्हास पवार म्हणाले की, समाजाचा त्यांनी प्रत्यक्ष व तळागळात जाऊन अभ्यास केला होता. चळवळीतून त्यांनी नेतृत्वाची उंची गाठली. त्यांच्या कामाचा, धडाडीचा आदर्श आपापल्या क्षेत्रामध्ये घेतला पाहिजे.
खोत म्हणाले की, मुंडे यांच्या जाण्याने तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची हानी झाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे ते नेतृत्व होते. सर्वाना बरोबर घेऊन जाणारे संवेदनशील मनही त्यांच्याकडे होते. महायुतीचे मात्रुत्व त्यांच्याकडे होते. त्यामुळे महायुतीचेही मोठे नुकसान झाले आहे.