औंध, सिंहगड रस्ता आणि कात्रज-कोंढवा रस्ता या भागातील आलिशान घरांच्या दराने वर्षांच्या पहिल्या तिमाहीत दणदणीत उसळी घेतली आहे. एका खासगी संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात औंध आणि सिंहगड रस्त्यावरील ३ बीएचके घरांच्या दरात तीन महिन्यांत प्रति चौरस फुटाला १७ टक्क्य़ांची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. तर कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ३ बीएचके घरांचे दर प्रति चौरस फूट १६ टक्क्य़ांनी वधारले आहेत. दुसरीकडे पिंपळे गुरव आणि हिंजवडीत घरांच्या किमतीत मात्र प्रति चौरस फूट अनुक्रमे ३६ टक्के आणि ३३ टक्के अशी घट नोंदवली गेली आहे.
‘९९ एकर्स डॉट कॉम’ या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात पुण्यासह, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांतील ३ बीएचके घरांच्या प्रति चौरस फूट किमतीतील फरकाची तुलना केली आहे. तुलनेसाठी त्या-त्या शहरातील निवडक भागातील घरांचे २०१३ च्या शेवटच्या तिमाहीतील व २०१४ च्या पहिल्या तिमाहीतील दर तपासले गेले.
या अहवालानुसार औंध हा पुण्यातील सगळ्यात महागडा भाग ठरला आहे. या भागात २०१३ च्या शेवटच्या तिमाहीत ३ बीएचके घरांचा दर प्रति चौरस फूट सुमारे ६२०० रुपये होता. २०१४ च्या पहिल्या तीन महिन्यांत हा दर १७ टक्क्य़ांनी वाढून प्रति चौरस फूट ७५०० रुपये इतका झाला आहे. तर सिंहगड रस्त्यावरील घरांचा दर प्रति चौरस फूट ४६०० रुपयांवरून ५५५० रुपयांवर गेला आहे. धानोरी, बाणेर-पाषाण लिंक रोड आणि वडगाव शेरीतील आलिशान घरांचे प्रति चौरस फूट दरही जानेवारी ते मार्च या कालावधीत अनुक्रमे १५ टक्के, १४ टक्के आणि १३ टक्क्य़ांनी वाढले आहेत. धायरी, हडपसर, विमाननगर, पिंपरी, टिंगरेनगर, आंबेगाव, तळेगाव, बालेवाडी, कोथरूड, वाघोली या सर्वच भागातील घरांच्या दरात वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो.
पिंपळे गुरव आणि हिंजवडीमधील आलिशान घरांचे दर मात्र उतरले आहेत. पिंपळे गुरवमधील ३ बीएचके घरांचा प्रति चौरस फूट दर गेल्या वर्षी ४७०० रुपये होता. हा दर या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत टब्बल ३६ टक्क्य़ांनी उतरला आणि ३४५० रुपये प्रति चौरस फुटांवर आला. हिंजवडी, कल्याणीनगर, मगरपट्टा, कात्रज, वानवडी, खराडी, वाकड आणि एनआयबीएम रस्ता या सर्वच ठिकाणच्या ३ बीएचके घरांचे दर घटले आहेत.
२०१३ आणि २०१४ च्या पहिल्या तिमाहीतील घरभाडय़ांची तुलना करता ३ बीएच घरांच्या भाडय़ांमध्ये मगरपट्टा, बालेवाडी, बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर या ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे. तर औंध, खराडी, विश्रांतवाडी आणि एनआयबीएम रस्त्यावरील घरांच्या भाडय़ात मात्र काहीही वाढ किंवा घट दिसून आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home rate reduce hike survey
First published on: 07-06-2014 at 03:15 IST