राज्यात मुंबईनंतर पुणे हे सर्वात मोठे शहर असून, या दोन्ही ठिकाणांमध्ये अंतर कमी आहे. त्यामुळे गुन्हेगारी विश्वातील लोकांकडून पुण्याच्या बांधकामांमध्ये (रिअल इस्टेट) मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याची सर्व सूत्रे मुंबईमध्ये आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी बुधवारी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘मुंबई अंडरवर्ल्ड : आज आणि उद्या’ या विषयावर त्यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सरचिटणीस राजेंद्र पाटील हे उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना झैदी यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.  मुंबई अंडरवर्ल्ड संपले असून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा कराचीत राहण्यास आहे. तो त्या ठिकाणीच राहील व त्या ठिकाणीच मरेल, असेही झैदी म्हणाले.