चक्रीवादळामुळे आवक कमी होण्याची शक्यता

पुणे : रत्नागिरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पुढील दहा दिवस रत्नागिरी हापूसची नियमित आवक बाजारात सुरू राहणार आहे. कोकणपट्टीत आलेल्या चक्रीवादळामुळे हापूसची आवक कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पुढील दोन ते तीन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला होता. करोनाचा संसर्ग असल्याने तोही परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात सध्या एक डझन रत्नागिरी हापूसची विक्री ३०० ते ८०० रुपये दराने केली जात आहे. सध्या बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागातून आंब्यांची आवक होत आहे. बाजारात दीड ते दोन हजार रत्नागिरी पेट्यांची दररोज आवक होत आहे. आंबा उत्पादक शेतक ऱ्यांना यंदाचा हंगाम चांगला होईल, अशी आशा होती. मात्र, मार्चपासून पुन्हा करोना संसर्ग वाढीस लागल्याने शेतक ऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. नागरिकांकडून आंब्याला फारशी मागणी नाही. अक्षयतृतीयेनंतर मागणीत घट झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या दरात काहीशी घट झाली आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अक्षयतृतीयेनंतर मागणीही कमी होत चालली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आंब्याच्या भावात दहा टक्क््यांनी घट झाली आहे. कोकण किनारपट्टीला तौक्ते वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तेथे पाऊस आहे. वादळाचा तडाखाही आंब्याला बसला आहे. वादळी परिस्थिती निवळल्यानंतर आंबा काढणे शक्य होईल. मात्र,वादळाचा तडाखा बसल्याने आंबाही टिकणार नाही. याबाबत पुढील दोन दिवसात चित्र समजेल.

– करण जाधव,  आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड