मराठा समाजाकडून त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी होत असल्याने ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसीमधील सर्व घटकांनी संघटित होण्याची गरज आहे, असे आवाहन ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात शनिवारी करण्यात आले.
ओबीसी महासंघटनेच्या वतीने हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महासंघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण सुपेकर, माजी आमदार कमलताई ढोले-पाटील, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद वडगावकर, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष म. ना. कांबळे, महासंघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश नाशिककर आदींची मेळाव्यात भाषणे झाली. महापौरपदी निवड झाल्याबद्दल चंचला कोद्रे यांचा या वेळी महासंघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नाशिककर म्हणाले की, ओबीसींना आरक्षण असूनही जागाच भरल्या जात नसल्याने ते मिळत नाही. राजकारणातील बहुतांश पदे व संपत्ती असणाऱ्यांना आरक्षण हवेच कशाला. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे, तरच आपला विजय होईल. आपण आता काही केले नाही, तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
ढोले- पाटील म्हणाल्या की, जे आरक्षण दिले गेले, त्यातही तुकडे पाडण्याचे काम होत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते काही करायचे ते करावे.
कांबळे म्हणाले की, ओबीसीतील घटकांमध्ये आता जागृती होत आहे. ही गोष्ट काहींना खटकते आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही, याबाबत वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे.
वडगावकर म्हणाले की, ओबीसीने जागृत झाले पाहिजे, अन्यथा आरक्षण जाईल. भविष्यात ३५ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्यातील ओबीसींचा वाटा जाईल. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची गरज काय. त्यासाठी शासनाने वेगळा ठराव करावा.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता’
आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसीमधील सर्व घटकांनी संघटित होण्याची गरज आहे, असे आवाहन ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात शनिवारी करण्यात आले.

First published on: 29-09-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In obc reservation save meeting appeal for all organization unity