पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांनी काल ‘शरद पवार विरोधक’ अशी ओळख असलेल्या माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे नेहमीच एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. बारामती लोकसभा मतदारसंघात भोर वेल्हा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अनंतराव थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांचा छुपा प्रचार केला होता. परंतु आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर थोपटे कोणाचा प्रचार करणार? असा प्रश्न पडला आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्यामुळे थोपटे अजितदादा गटाचा प्रचार करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : उष्णतेच्या लाटांसह यंदाचा उन्हाळा कडक; तीन महिन्यांसाठी हवामान विभागाचा अंदाज काय?

बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांनी तुतारी चिन्हासोबत फोटो ट्विट करून आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तर सुनेत्रा पवार यांनीही आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भोर तालुक्याच्या दौरा दरम्यान सुनेत्रा पवार यांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली. आमदार संग्राम थोपटे, त्यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे, मुलगा पृथ्वीराज थोपटे या वेळी उपस्थित होते. भोर मतदारसंघावर सुरुवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार होते. सोबतच ते मंत्री देखील होते. त्यानंतर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे गेली १८ वर्षे आमदार आहेत.