मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात फ्लॅावर, कांदा, बटाटा, मटार, मिरची, पापडी, काकडी या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजाराचे कामकाज बंद राहणार असल्याने रविवारी खरेदीदारांची गर्दी केली होती.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१४ ऑगस्ट) राज्य तसेच परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा तसेच ४ ते ५ टेम्पो कोबी, इंदूरहून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ७ ते ८ ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ३० ते ४० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, कोबी ५ ते ७ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो १४ ते १५ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

पालेभाज्या महाग
पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून पालेभाज्या खराब झाल्या आहेत. पालेभाज्यांना मागणी चांगली आहे. चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना दर मिळत आहेत. कोथिंबिर, कांदापात, चाकवत, पुदिना, पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. शेपू, राजगिऱ्याच्या दरात घट झाली आहे. मेथी, करडई, अंबाडी, मुळा आणि चुक्याचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या पावणेदोन लाख जुडी तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिबिरेच्या जुडीमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. कांदापात तीन रुपये, पुदिना आणि पालकाच्या जुडीमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

लिंबू, खरबूज, चिकूच्या दरात वाढ
श्रावण महिन्यातील उपवासासाठी फळांना मागणी वाढली आहे. लिंबू, खरबूज, चिक्कूच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अननस, डाळिंब, संत्री, मोसंबी, कलिंगडाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात लिंबे एक ते दीड हजार गोणी, डाळिंब ४० ते ५० टन, पपई ८ ते १० टेम्पो, कलिंगड ५ ते ७ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, सफरचंद ७ ते ८ हजार खोकी, सीताफळ ८ ते १० टन, संत्री २ टन, मोसंबी ४ ट्रक, पेरू ७०० ते ८०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

श्रावणात फुलांना मागणी

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. फुलांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त फुलांच्या मागणीत वाढ झाली असून चांगल्या प्रतीच्या फुलांना मागणी असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.