पोलिसांचा वचक हवा, महापौरांचे पोलीस आयुक्तांना पत्र

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या परिसरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलिसांचा वचक असला पाहिजे, असे पत्र महापौर माई ढोरे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिले आहे.

महापौर ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली महिला लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ गुरुवारी पोलीस आयुक्तांना भेटले. या वेळी झालेल्या चर्चेत शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चिंता महापौरांनी व्यक्त केली.

शहरातील युवती तथा महिलांवर घरगुती हिंसा, अन्याय, अत्याचार, बलात्कार आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुसंख्य महिला नोकरदार आहेत. कामाच्या निमित्ताने त्यांना वेळी-अवेळी घराबाहेर पडावे लागते. गेल्या काही दिवसांच्या घटना पाहता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने पोलीस आयुक्तांनी कडक उपाययोजना कराव्यात. जेणेकरून पोलीस खात्याचा धाक निर्माण झाला पाहिजे. आनंदनगर (चिंचवड), वाकड, भोसरी, घोराडेश्वर (तळेगाव) येथील महिला अत्याचारांच्या घटनांचा तपास पोलिसांनी वेगाने पूर्ण करावा आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा. महिलांशी संबंधित कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी महापौरांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चिंता महापौर माई ढोरे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केली.