लोहमार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच लोहमार्गाच्या बाजूला वाढत असलेल्या वस्त्यांकडे रेल्वेकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे. स्थानकाच्या आवारात चुकीच्या पद्धतीने लोहमार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातांपेक्षा रेल्वेलगतच्या वस्त्यांजवळ होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे.
रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मागील चार महिन्यांमध्ये झालेल्या अपघातात अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात तब्बल १४० लोकांना जीव गमवाला लागला. ही संख्या मागील अनेक वर्षांच्या तुलनेत मोठी आहे. पुणे विभागात रोज किमान दोन ते तीन लोकांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू होत असल्याचे दिसून येते. अनधिकृतपणे कोणत्याही ठिकाणाहून लोहमार्ग ओलांडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. याबाबत रेल्वेकडून वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येतात. याबाबत जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात येत असतात. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नसल्याचे अपघातातील मृतांच्या संख्येवरून दिसून येते. लोहमार्गालगत वाढत असलेल्या वस्त्या लोहमार्गावरील मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागील एक प्रमुख कारण आहे.
पुणे विभागात लोणावळ्यापासून दौंडपर्यंतची स्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी रेल्वेच्या जागेवर वस्त्या आहेत. काही वस्त्या ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या आहेत, तर काही भागात सातत्याने नव्या झोपडय़ा उभ्या राहात असतात. रेल्वे स्थानकाच्या जवळच्या भागामध्ये अशा प्रकारच्या वस्त्यांचे प्रमाणे मोठे आहे. पुणे-लोणावळा विभागाबरोबच पुणे-घोरपडी व घोरपडी ते सासवड या पट्टय़ामध्ये रेल्वेच्या जागांना मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. लोहमार्गालगत वाढलेल्या या अतिक्रमणांमुळे रेल्वेसाठीही विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातून रेल्वेच्या सुरक्षेलाही काही वेळेला धोका निर्माण होत असतो. लोहमार्गालगतच्या जुन्या वस्त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यातच नव्या अतिक्रमणांची भर पडते आहे. लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला वस्त्या वाढल्याने अशा वस्त्यांमधून लोहमार्ग ओलांडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यातून अनेक अपघात होत आहेत. काही महत्त्वाच्या वस्त्यांच्या भागामध्ये रेल्वेकडून सीमाभिंती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, या भिंती फोडल्या जातात. त्याकडे अनेकवर्षे लक्षही दिले जात नाही.
स्थानकालगतच्या अवैध धंद्यांमुळेही परिणाम
रेल्वे स्थानकांजवळ अनेक प्रकारचे अवैध धंदे सातत्याने सुरू असतात. हातभट्टीची दारू विक्री किंवा मटका आदी अवैध धंदे स्थानकांच्या जवळच्या परिसरात प्रामुख्याने होतात. त्यामुळेही लोहमार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या वाढते. त्यातूनही रेल्वेच्या धडकेने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होते आहे. अशा प्रकारच्या धंद्यांवर कारवाई करण्याबरोबरच सातत्याने अपघात होत असलेल्या वस्त्यांच्या भागात सीमाभिंती उभारण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.