आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड २०१३ मध्ये भारताला २ रौप्य पदके आणि ३ ब्रॉंझ पदके मिळाली असून, भारताचे नेतृत्व करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांच्या गटातील पुण्यातील गरवारे महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिश सेवेकरी याला ब्रॉंझ पदक मिळाले आहे.
चोपन्नावी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड १६ ते २४ जुलै दरम्यान कोलंबिया येथे झाली. या स्पर्धेमध्ये सहा जणांच्या संघाने भारताचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेमध्ये जगातील ९७ देशांमधून ५२८ विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीतील शुभम सिन्हा आणि कोलकत्यातील सागनिक साहा या विद्यार्थ्यांनी रौप्य पदके पटकावली आहेत. तर अनिश बरोबरच छत्तीसगडमधील पल्लव गोयल आणि हैदराबाद येथील प्रणव नुती या विद्यार्थ्यांनाही ब्रॉंझ पदके मिळाली आहेत. पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचा विद्यार्थी चैतन्य टप्पू याचाही या संघामध्ये सहभाग होता.
भारतीय संघाचे नेतृत्व होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे गणित ऑलिम्पियाड विभागाचे समन्वयक प्रा. सी.आर. प्रणेश्चर यांनी केले. पुण्यातील नवरोसजी वाडिया महाविद्यालयातील डॉ. अदिती फडके यांनी उपनेता म्हणून, तर फग्र्युसन महाविद्यालयातील डॉ. व्ही. व्ही. आचार्य यांनी संघाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. अनिश आणि चैतन्य हे दोघेही बारावीमध्ये आहेत. भारतीय संघ मुंबईमध्ये बुधवारी परतणार आहे.