घशाचे आजार आणि ताप हे आता केवळ पावसाळ्याचे आजार उरलेले नसून ते बारमाही आजार बनले आहेत. शहरातील आजारांची गेल्या ८ महिन्यांची आकडेवारी पाहता घशाचा तीव्र संसर्ग आणि इन्फ्लुएन्झासारखा ताप या आजारांचे रुग्ण अगदी प्रत्येक महिन्यात आणि मोठय़ा संख्येने आढळत असल्याचे दिसून येत आहे. बदललेल्या जीवनशैलीतील चुकीच्या किंवा अपरिहार्य सवईंमुळे प्रतिकारशक्तीवर होणारा प्रतिकूल परिणाम या आजारांचा संसर्ग होण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पालिकेने पुरवलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत शहरात घशाचा तीव्र संसर्ग (अक्यूट रेस्पायरेटरी इन्फेक्शन) आणि ताप (इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस) या दोन आजारांचे तब्बल ९,६०० रुग्ण सापडले आहेत. जानेवारीत या आजारांच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे २,९१८ होती, तर फेब्रुवारीत त्याचे १,३१४ रुग्ण आढळले होते. मार्चपासून जूनपर्यंत या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली. मे मध्ये आजारांचे सर्वात कमी म्हणजे ४४५ रुग्ण सापडले होते. जुलैपासून मात्र त्यात पुन्हा वाढ झालेली दिसत असून जुलैत या आजारांचे १,५७१ रुग्ण तर ऑगस्टमध्ये १,६१३ रुग्ण आढळले आहेत.
श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. श्रीरंग उपासनी म्हणाले, ‘‘श्वसनमार्गाच्या वरच्या भागात होणाऱ्या जीवाणूसंसर्गात सर्दी, खोकला आणि ताप हीच सर्वसाधारण लक्षणे दिसतात. तर, विषाणूजन्य ‘फ्लू’मध्ये अंग दुखते, थकवा आणि मलूलपणा येतो. वर्षभर आढळणारे हे आजार टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे हाच उपाय आहे. त्यासाठी योग्य आहार आणि शारीरिक व्यायामाबरोबरच फुफ्फुसांची क्षमता वाढवण्याचे व्यायाम करणेही आवश्यक आहे. आपण नेहमी जो श्वासोश्वास करतो त्यात खोलवर श्वास घेतला जात नाही. त्यामुळे खोल श्वास घेण्याचा व्यायाम गरजेचा आहे. चालणे, जॉगिंग करणे, पोहणे हे व्यायाम फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. सर्व जीवनसत्त्वे पोटात जातील असा आहार घेणेही तितकेच गरजेचे. आजच्या जीवनशैलीतील वाढलेला दैनंदिन ताण, पुरेशी झोप न घेणे ही देखील प्रतिकारशक्तीवर प्रतिकूल परिणाम करणारी कारणे ठरतात.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infection sickness flu doctor
First published on: 17-09-2014 at 03:20 IST