आयाम, आशय फिल्म क्लब, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारपासून (६ मार्च) चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रपट-लघुपटाच्या माध्यमातून कलाकार महिलेचा घेतलेला शोध हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता ज्येष्ठ कथक नृत्यांगना प्रभा मराठे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरी लागू यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नृत्य, गायन, चित्रकला, शिल्पकला अशा विविध कलांमधून कलावंत स्त्री आणि तिचे जीवन मांडलेले चित्रपट महोत्सवात पाहता येणार आहेत. संध्या गोखले प्रस्तुत ‘फेमिनाइन विमेन’ संकल्पनेवर देश-विदेशातील पाच चित्रपट पाहता येणार आहेत. ‘फ्रिडा’, ‘पिना’, शिल्पकार महिलेवर फ्रेंच सिनेमा ‘कॅमिल क्लौडेल’, प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगील, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल आणि ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर आदींवर आधारित लघुपट दाखवण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International womens film festival
First published on: 05-03-2015 at 03:05 IST