‘‘कमी स्रोतांमधून जास्त निर्मिती करणे आणि त्यातून अधिकाधिक जनतेच्या गरजा भागवणे ही येत्या काळाची गरज आहे. आपल्यासमोरील आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि त्यादृष्टीने शिक्षणसंस्थांची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे,’’असे मत प्राज इंडस्ट्रिजचे मुख्य कार्यकारी संचालक प्रमोद चौधरी यांनी शनिवारी व्यक्त केले.
भारतीय विश्वविद्यालय संघाच्यावतीने ‘अन्वेषण’ या विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या पश्चिम विभागाच्या फेरीचे उद्घाटन शनिवारी झाले. या वेळी भारतीय विश्वविद्यालय संघाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. रमादेवी पानी, अन्वेषणच्या समन्वयक डॉ. उषा नेगी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. विश्वास गायकवाड, पश्चिम विभागीय स्पर्धेचे समन्वयक डॉ. रविंद्र जायभाये उपस्थित होते.
‘ऑल अन्वेषण’ ही देशपातळीवर विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी संशोधन प्रकल्पांची स्पर्धा आहे. शेती, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा पाच विभागांमध्ये विद्यार्थी प्रकल्प सादर करणार आहेत. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थानमधील विद्यापीठे असून विभागीय फेरीसाठी विविध विद्यापीठांमधून ९१ प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. या वेळी चौधरी म्हणाले, ‘‘सध्या ज्ञानाचे युग आहे. त्यामुळे येत्या काळात संशोधनाला विशेष स्थान आहे. मानवता, सामाजिक शास्त्र या विषयांनाही विशेष महत्त्व असणार आहे. आपल्यासमोरील आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि त्यादृष्टीने शिक्षणसंस्थांची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठांनी उद्योग क्षेत्राच्याबरोबरीने काम करणे गरजेचे आहे.’’