महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या (एमजीएनएल) खोदकामामध्ये जेसीबीने भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने सोमवारी पहाटेपासून बिबवेवाडी भागातील ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कंपनीने पर्यायी व्यवस्थेतून संध्याकाळपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत केला.
बिबवेवाडी येथील चिंतामणी रुग्णालयाच्या जवळ ‘एमजीएनएल’च्या ठेकेदाराकडून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात येत होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास २२ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी खोदकाम करताना तुटली. त्यामुळे या परिसरातील सुमारे ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. याबाबत पहाटे चारच्या सुमारास तक्रार आल्यानंतर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज खंडित होण्याच्या कारणाचा शोध घेतला असता, जेसीबीने वीजवाहिनी तोडल्याचे लक्षात आले.
तुटलेल्या भूमिगत वीजवाहिनीवरून सिमेंट काँक्रीटचा थर असल्याने तातडीने दुरुस्ती शक्य नसल्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास सोनार गार्डन, रम्यनगरी, पोकळे वस्ती, सिल्व्हर इस्टेट, मधुसूदन पार्क आदी भागांमध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, महेश सोसायटी, प्रसन्ना सोसायटी, गणेशविहार, चिंतामणीनगर आदी भागांतील वीज गायबच होती. दरम्यानच्या काळात वीजवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. दुपारी साडेचारच्या सुमारास ८० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.