जेजुरीतील नाझरे धरणात बुडून मुलाचा मृत्यू, दोघांना वाचविले

जेजुरी परिसरात असलेल्या नाझरे धरणात बुडून चौदा वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला, धरणात बुडालेल्या आणखी दोन मुलांना भाविक आणि स्थानिक तरुणांनी वाचविले.

जेजुरी परिसरात असलेल्या नाझरे धरणात बुडून चौदा वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला, तर धरणात बुडालेल्या आणखी दोन मुलांना भाविक आणि स्थानिक तरुणांनी वाचविले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
हेमंत वासुदेव पाटील (वय १४, रा. उंबरडे, ता. कल्याण) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. जेजुरीत दर्शनासाठी ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण येथून बसने पन्नास भाविक आले होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाविक नाझरे धरणात (मल्हारसागर) आंघोळीसाठी उतरले. त्यांच्यासोबत मुले होती. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हेमंत पाटील आणि त्याच्यासोबत मुकेश मढवी, दक्ष पाटील हे बुडाले. बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने आरडाओरडा केला. भाविक आणि स्थानिक तरुणांनी पाण्यात बुडालेल्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
हेमंत पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेले मुकेश आणि दक्ष यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी घटनास्थळी भेट दिली. सामाजिक कार्यकर्ते अरुण बारभाई, गणेश डोंबे, रज्जाक तांबोळी, खंडू चव्हाण, बाळू सोनवणे यांनी बुडालेल्या हेमंत याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गाळात रुतलेला हेमंत याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जेजुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर नाझरे धरण आहे. धरणाच्या पात्रात खड्डे असल्याने पाण्यात उतरलेल्या भाविकांना अंदाज येत नाही. यापूर्वी नाझरे धरणात बुडून भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jejuri nazare dam one death