चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या युवतीवर उपप्राचार्य आणि शिक्षकाने चोरीचा आरोप केल्याने तिने महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारू न आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२४ जून)  घडली. युवतीवर आरोप करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपप्राचार्यासह तीन जणांविरुद्ध पिंपरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वा सोमनाथ वाघमारे (वय १७)असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिची आई लक्ष्मी सोमनाथ वाघमारे (वय ३५ रा. बिरमानी व्हिला, शितलानगर, मामुर्डी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य भूषण महाजन (वय ३५,रा. मोहननगर, चिंचवड) आणि महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पूर्वाला शुक्रवारी (२३ जून) महाविद्यालयाच्या आवारात पर्स सापडली. तिने पर्स तिथेच ठेवली. त्यानंतर तेथे आणखी एक युवती आली. पर्समध्ये आठ हजार रुपये होते, असे युवतीने पूर्वाला सांगितले. युवतीने महाविद्यालयाचे शिक्षक आणि उप-प्राचार्यांकडे तिच्या पर्समधील पैसे चोरीला गेल्याची तक्रार केली. त्यानंतर उपप्राचार्यानी पूर्वाला महाविद्यालयात पालकांना घेऊन ये, असे सांगितले.

पूर्वा तिच्या पालकांसोबत शनिवारी महाविद्यालयात आली.  उपप्राचार्यानी आणि शिक्षकांनी पालकांना अर्धा तास कार्यालयाबाहेर थांबविले. पालकांनी उपप्राचार्याची भेट घेतली, तेव्हा पूर्वाने पर्समधील आठ हजार रुपये चोरले, असा आरोप उपप्राचार्यानी केला. तेव्हा, पैसे मी चोरले नाही, असे पूर्वाने निक्षून सांगितले. पण चोरीचा केलेला आरोप सहन न झाल्याने पूर्वाने  महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारली.

गंभीर जखमी झालेल्या पूर्वाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पूर्वाच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एच.एस.बोचरे पुढील तपास करत आहेत.