शास्त्रीय संगीतासह रंगभूमी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दी वर्षांकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्षच झाल्याविषयीची खंत रविवारी व्यक्त झाली. विविध कलाकारांची स्मारके करणाऱ्या सरकारने ज्योत्स्ना भोळे यांच्या गायकीचे स्मरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असा सूर आळवण्यात आला.
स्वरवंदना प्रतिष्ठानतर्फे ज्योत्स्ना भोळे जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून भोळे यांची प्रतिमा पुणे भारत गायन समाज संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फैय्याज हुसेन खाँ यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा शैला दातार यांनी ही प्रतिमा स्वीकारली. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि ज्योत्स्नाबाईंची कन्या वंदना खांडेकर, स्वरानंद प्रतिष्ठानचे प्रा. प्रकाश भोंडे, समाजाचे विश्वस्त सुहास दातार या वेळी उपस्थित होते.
वंदना खांडेकर म्हणाल्या, केशवराव भोळे आणि ज्योत्स्ना भोळे यांचे भारत गायन समाजाशी दृढ संबंध होते. म्हणूनच आईची प्रतिमा समाजाकडे सुपूर्द करताना त्या आठवणी चिरंतन राहतील.
फैय्याज हुसेन खाँ म्हणाले, ज्योत्स्ना भोळे या थोर गायिकेशी परिचय असणे हा माझ्या आयुष्यातील भाग्य योगच समजतो. त्यांना गायनाचे सर्व प्रकार अवगत होते. त्यांचे जीवन हीच खऱ्या अर्थाने सुरेल मैफल होती. त्यांना संगत करण्याची संधी मला लाभली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आग्रा घराण्याचे गायक राजा मियाँ यांच्या गायनाची मैफल झाली.