निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ‘भांडारकर’ च्या घटना दुरुस्तीचा घाट

गेली ९६ वर्षे ज्या घटनेद्वारे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा कारभार सुरू होता त्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये येणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेच्या घटना दुरुस्तीचा घाट घातला जात आहे.

गेली ९६ वर्षे ज्या घटनेद्वारे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा कारभार सुरू होता त्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये येणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेच्या घटना दुरुस्तीचा घाट घातला जात आहे. शतकाला अवघी चार वर्षे बाकी असताना संस्थेच्या घटना दुरुस्तीची आवश्यकताच काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
भांडारकर संस्थेची स्थापना ६ जुलै १९१७ रोजी झाली. संस्थेच्या स्थापनेपासून जी घटना अमलात आली त्यानुसारच गेली ९६ वर्षे कामकाज सुरू आहे. मात्र, पुढील वर्षी संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक होत असून ६ जुलै २०१४ रोजी कारभारी सूत्रे हाती घेणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाच्या प्रमाणात घट होऊन आपल्याला अनुकूल अशी मंडळी नियामक मंडळावर यावीत हाच या घटना दुरुस्तीमागचा उद्देश आहे. संस्थेच्या घटना दुरुस्ती समितीचे अध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यांच्या समितीने सुचविलेला मसुदा ६ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला येत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
संस्थेच्या घटनेनुसार नियामक मंडळाच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी पुण्यातील मतदार संस्थेमध्ये येऊन मतदान करतात. त्याचबरोबरीने पुण्याबाहेरील आजीव सभासदांना पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविली जाते. मात्र, नव्या घटना दुरुस्तीनुसार जे मतदार प्रत्यक्ष येऊन मतदान करू शकणार नाहीत, अशांनी ‘आपल्याला या निवडणुकीसाठी मतदान करावयाचे असून मतपत्रिका पाठवावी’ असे लिखित स्वरूपात कळवावयाचे आहे. यामुळे एकूण मतदानाच्या संख्येमध्ये घट होणार असून भविष्यातील नियामक मंडळाच्या सदस्यांना विजयासाठीचे गणित सोपे व्हावे हाच या घटना दुरुस्तीचा उद्देश असल्याचे स्पष्टपणाने ध्यानात येते, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत अडीच हजार आजीव सभासदांपैकी केवळ ११०० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

अशीही दक्षता
या नव्या मसुद्याविषयी सूचना आणि हरकती पाठवाव्यात असे आवाहन घटना दुरुस्ती समितीने केले आहे. मात्र, त्यासाठी संस्थेच्या आजीव सभासदांना ६ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेची नोटीस, कार्यपत्रिका आणि घटना दुरुस्तीचा मसुदा किमान २१ दिवस आधी पोहोचणे गरजेचे असल्याचे संस्थेच्या घटनेमध्ये नमूद केले आहे. आजीव सभासदांना अद्यापही सभेची नोटीस मिळाली नसल्याने या मसुद्यासंदर्भात सूचना किंवा हरकती येणार नाही, अशी दक्षताही जाणीवपूर्वक घेण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Keeping eye on election plot to change constitution of bhandarkars