सातत्याने अधिक राहणाऱ्या तापमानामुळे गेल्या २-३ आठवडय़ांपासून लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये उन्हाचा त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. ताप येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, प्रचंड घाम आणि थकवा येणे तसेच चुकीच्या खाण्यापिण्यामुळे घसा दुखणे, सर्दी-खोकला, पित्त तसेच लघवीच्या व पोटाच्या विकारांचा प्रादुर्भाव सध्या प्रामुख्याने दिसून येत आहे. या दोन वयोगटांसह दिवसभर वातानुकूलित वातावरणात काम करणाऱ्या नागरिकांनाही एकदम उन्हात बाहेर पडल्यावर त्रास होताना दिसत आहे.
या दिवसांत दुपारच्या वेळी बाहेर पडावे लागल्यास ज्येष्ठ नागरिकांना शरीरातील पाणी कमी होणे (डीहायड्रेशन), चक्कर येणे असा त्रास संभवू शकतो, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवले आहे. त्यातच ज्येष्ठांना मधुमेह वा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर उन्हाच्या तीव्रतेचा त्रास वाढू शकतो. थंड पाणी पिल्यामुळे ज्येष्ठांना छातीत कफ साठून खोकल्याचा त्रास होऊ शकतो, असे डॉ. संताजी कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ज्येष्ठांनी शक्यतो दुपारच्या वेळात बाहेर जाणे टाळावे, तसेच बाहेर जावे लागलेच तर बरोबर पाणी, लिंबू सरबत, खडीसाखर बाळगावी. पाच वर्षांच्या आतील मुलांना ताप आल्यास या दिवसांतील अधिक तापमानामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अचानक वाढून आकडी येण्याची शक्यता असते. यात रुग्णाचे शरीर तापण्याबरोबरच हातापायाला झटके येतात व रुग्णाचे नातेवाईक घाबरून जातात. अशा वेळी लहान मुलांना प्राथमिक उपाय म्हणून ओल्या फडक्याने पुसावे व कपाळावर ओल्या कापडय़ाच्या पट्टय़ा ठेवाव्यात आणि त्वरित डॉक्टरांची मदत घ्यावी. १० ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये बाहेरून आल्यावर एकदम थंड पाणी पिणे आणि चमचमीत खाण्यामुळे पित्त वाढून त्यामुळे मळमळ, ताप, थंडी वाजून येणे, उलटी होणे व उलटी झाल्यावर बरे वाटणे ही लक्षणे दिसत आहेत. हा पित्ताचा ताप साधारणत: ३ दिवसांनी बरा होतो.’
डॉ. राजेश आनंद म्हणाले, ‘अगदी लहान बाळे व त्याहून थोडी मोठी बालके यांची रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली नसते. त्यामुळे त्यांना उन्हाळा बाधत असल्याचे दिसून येत आहे. बाळांमध्ये उलटय़ा, जुलाब, अपचन, चिडचिडेपणा हे त्रास दिसत आहेत. मूल आईचे दूध पिणारे असल्यास आईला होणारा उन्हाचा त्रास व तिचे खाणेपिणे योग्य नसेल, तर त्यामुळे बाळांनाही त्रास जाणवत आहे.’
‘एसी’त बसणाऱ्यांनो, काळजी घ्या!
दिवसभर वातानुकूलित यंत्रणेत बसून काम करणाऱ्या व्यक्तींनाही एकदम उन्हात गेल्यावर गळून गेल्यासारखे वाटणे, घाम येणे असे त्रास जाणवत आहेत. तसेच थंड पेये व चमचमीत अन्न सतत घेतल्यामुळे अपचन, उलटीची भावना होणे, जुलाब असे पोटाचे त्रास या मंडळींमध्ये अधिक दिसत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. एकदम उन्हात गेल्यावर त्रास होणे टाळण्यासाठी अधूनमधून बाहेरील वातावरणाशी गरम जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kid senior heat air conditioned troubles
First published on: 21-04-2016 at 03:30 IST