scorecardresearch

कागदावरील बालभारती-पौड रस्त्याला गती

काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची प्रक्रिया तातडीने करण्यात येणार असून रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आवश्यक भूसंपादन अंतिम टप्प्यात; कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर पर्याय

पुणे : बहुचर्चित आणि प्रदीर्घ काळ कागदावर राहिलेला बालभारती- पौड रस्ता हा प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोथरूडहून थेट सेनापती बापट मार्गाला जोडणाऱ्या या प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठीची भूसंपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची प्रक्रिया तातडीने करण्यात येणार असून रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्याची शक्यता आहे.

कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पौड रस्त्यावरून थेट सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती पर्यंतचा रस्ता विकास आराखडय़ात (डीपी) प्रस्तावित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता कागदावरच राहिला आहे. त्यामुळे कोथरूड येथून औंधकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा हेलपाटा मारावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर रखडलेल्या रस्त्याला गती देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू झाले असून पर्यावरणीय मूल्यांकन अभ्यास आणि वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामाचा आढावा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला. महापालिक आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे, प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर कदम आणि बिपीन शिंदे या वेळी उपस्थित होते. त्या वेळी रस्त्यासाठीचे बहुतांश ठिकाणचे भूसंपादन पूर्ण झाले असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.  शहराच्या वाहतुकीला वेग देण्यासाठी विविध उड्डाणपूल आणि रस्त्यांची बांधणी करण्यात येत आहे. त्यात बालभारती-पौड रस्ता महत्त्वाचा आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पर्यावरण प्रेमींचा आक्षेप

रस्त्यासाठी वेताळ टेकडीचा काही भाग फोडण्यात येणार असल्याने पर्यावरण प्रेमी, अभ्यासक आणि संस्थांनी त्याबाबत आक्षेप घेतला आहे. त्याविरोधात न्यायालयातही धाव घेण्यात आली होती.  दरम्यानच्या काळात महापालिकेने  वाहतूक आराखडा तसेच प्रकल्पाचे पर्यावरण आघात मूल्यांकनही करून घेतले होते. न्यायालयाने सांगितल्यानुसार हा अहवाल संबंधित याचिकाकर्त्यांनाही दाखविण्यात आला होता. त्यांनी या अहवालाची पडताळणी केल्यानंतर काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर तीन वेळा या याचिकाकर्त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने या रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

राज्य शासनाची मान्यता

बालभारती ते पौड या दरम्यान दोन किलोमीटर लांबीचा आणि तीस मीटर रुंदीचा रस्ता विकास आराखडय़ात दर्शविण्यात आला आहे.राज्य शासनाने विकास आराखडय़ाला जानेवारी २०१७ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर हरकती-सूचनांची सर्व प्रक्रिया पूर्ण करून रस्ता आराखडय़ात दर्शविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता या रस्त्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आल्याचा आक्षेप पर्यावरणप्रेमींनी नोंदविला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Land acquisition for balbharati paud road in final stage

ताज्या बातम्या