खासगी कंपनीतील एका अधिकाऱ्याचा लॅपटॉप रिक्षात विसरतो.. मोठय़ा किमतीचा व कंपनीची अत्यंत महत्त्वाची माहिती असलेला लॅपटॉप हरविल्याचे लक्षात आल्यानंतर या अधिकाऱ्याच्या पायाखालची वाळूच सरकते.. दुसरीकडे कोणाचा तरी लॅपटॉप रिक्षात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी रिक्षाचालक प्रयत्न सुरू करतो.. पाचसहा दिवस प्रयत्न प्रयत्न केल्यानंतर एक ई-मेल’ पत्ता सापडतो.. हा ई-मेलच रिक्षा चालकाच्या प्रयत्नांच्या यशाची चावी ठरतो अन् सुखद शेवट होत आठवडय़ानंतर लॅपटॉप अधिकाऱ्याच्या हाती पडतो..!
महेश सुरवसे, असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षा पंचायतीचे सदस्य असलेल्या सुरवसे यांनी खासगी कंपनीत विपणन अधिकारी असणाऱ्या जितेंद्र तिवारी यांना २१ नोव्हेंबरला रेंजहिल्स येथून रिक्षाने पुणे रेल्वे स्थानकावर सोडले. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने लॅपटॉप रिक्षातच विसरल्याचे तिवारी यांच्या लक्षात आले. लॅपटॉप किमती तर होताच, पण कंपनीची अत्यंत महत्त्वाची माहिती त्यात असल्याने तिवारी यांचे डोके सुन्न झाले. त्यांनी जवळच असलेल्या ताडीवाला रस्ता पोलीस चौकीत लॅपटॉप हरविल्याची तक्रार दाखल केली. तक्रार झाली, पण आता लॅपटॉपचे काय हा प्रश्न त्यांच्यापुढे कायम होता. पुढील आठवडाभर त्यांनी लॅपटॉप शोधण्यासाठी शहर िपजून काढले.
दुसरीकडे रिक्षा चालक सुरवसे हेही लॅपटॉप परत देण्यासाठी प्रयत्न करीत होते. तिवारी यांना पुणे रेल्वे स्थानक येथे सोडल्यानंतर सुरवसे रिक्षा घेऊन रुबी रुग्णालयात गेले होते. सुरवसे पंधरा वर्षे लडकत पेट्रोल पंपावर कामाला होते. पंपाचे मालक मनीष लडकत हे रुबी रुग्णालयात अत्यवस्थ होते. त्यांना भेटण्यासाठी सुरवसे तेथे गेले होते. रात्री घरी गेल्यानंतर रिक्षाच्या मागील आसनावर लॅपटॉप असल्याचे त्यांना दिसले. तो परत कसा करायचा याचा विचार त्यांनी सुरू केला. दुर्दैवाने लडकत यांचे दुसऱ्या दिवशी निधन झाले. त्यामुळे एकदोन दिवस त्या दु:खात गेले. २१ नोव्हेंबरला पुणे स्टेशनवर सोडलेल्या प्रवाशाचा हा लॅपटॉप असावा, असे सुरवसे यांना वाटत असल्याने ते तिवारी यांनी रिक्षा पकडली त्या भागात रोज काही वेळ जाऊन थांबू लागले. मात्र तिवारी काही भेटले नाहीत.
सुरवसे यांनी एकदा हा लॅपटॉप त्यांचा पुतण्या दीपक सुरवसे याला दाखविला. दीपकने लॅपटॉपच्या बॅगची तपासणी केली. त्यात त्याला एका कागदावर ई-मेल पत्ता सापडला. या ई-मेलवर दीपकने ‘तुमचा लॅपटॉप हरवला असेल, तर संपर्क साधा’ असा संदेश पाठवून एक मोबाइल क्रमांक दिला. हा मेल तिवारींना मिळाल्यानंतर त्यांना आकाशच ठेंगणे झाले. त्यांनी तातडीने सुरवसे यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. लॅपटॉप घेण्यासाठी सुरवसे यांनी तिवारींना रिक्षा पंचायतीत बोलविले. पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते तिवारी यांना लॅपटॉप परत देण्यात आला.