मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त याला पत्नीच्या वैद्यकीय उपचारांसाठी दिलेल्या तीस दिवसांच्या संचित रजेबाबत (पॅरोल) वादंग निर्माण झाल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या निर्णयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संजय दत्तला नियमाप्रमाणेच आणि सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच संचित रजा देण्यात आली आहे. त्याला कोणतीही विशेष सवलत दिलेली नाही, अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी शनिवारी दिली.
पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी संजय दत्तला तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली. तो तीस दिवसांची अभिवाचन रजा (फरलो) संपवून महिन्यापूर्वीच कारागृहात दाखल झाला होता. त्यानंतर लगेचच त्याला ही रजा मंजूर झाल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कारागृहाबाहेर निर्दशने केली. संजय दत्तला दिलेली संचित रजा रद्द करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. संजय दत्त याने जुलै महिन्यात संचित रजेसाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी कारागृह प्रशासन आणि खार (मुंबई) पोलिसांकडून अहवाल मागवला होता. खार पोलिसांनी दिलेल्या अहवालासोबत संजय दत्तची पत्नी मान्यता हिचा वैद्यकीय अहवाल जोडण्यात आला आहे. या अहवालनुसार संजय दत्तला पत्नीच्या उपचारांसाठी तीस दिवसाची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी त्याचा मेव्हणा कुमार गौरव हा जामीन राहिला आहे.
याबाबत देसाई यांनी सांगितले, की सगळ्या गोष्टीची पूर्तता करूनच संजय दत्तला संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक कैद्याला संचित रजा (पॅरोल) आणि अभिवाचन रजा (फलरे) या रजा दिल्या जातात. संजय दत्त हा अभिवाचन रजेवर जाऊन आला आहे. कारागृहाच्या नियमावलीनुसार अभिवाचन रजेवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा संचित रजा मंजूर होऊ शकते. अनेक गंभीर गुन्ह्य़ातील कैद्यांना याप्रकारे संचित रजा मंजूर झाली आहे. यामध्ये वेगळे काहीच नाही.