लोकजागर : आम्ही नादान आहोत!

नगरसेवकाकडून फुकट मिळणारी बाकडी आणि पिशव्यांच्या बदल्यात खुशाल मत देऊन टाकणारे आम्ही सगळेजण किती नादान आहोत!

मुकुंद संगोराम

mukund.sangoram@expressindia.com

नगरसेवकाकडून फुकट मिळणारी बाकडी आणि पिशव्यांच्या बदल्यात खुशाल मत देऊन टाकणारे आम्ही सगळेजण किती नादान आहोत! निवडणुका तोंडावर आल्या की सारे शहर कसे फ्लेक्समय होऊन जाते. यंदा तर शहरभर नवयुवक नेत्यांचे वाढदिवस इतक्या धूमधडाक्यात साजरे होऊ लागले आहेत, की या शहरात नेत्यांचीच शेती केली जाते की काय, असा प्रश्न पडावा. जिथे तिथे भाऊ, दादा, ताई, अक्का यांची चित्रपटातील नटनटय़ांना लाजवतील अशी छायाचित्रे. एका बाजूला असले फडतूस फलक लावण्यास न्यायालयाने बंदी केली असताना आणि असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना, हे फलक नागरिकांकडून जमा केलेल्या करातून आपणहून काढून घेण्याचा उद्धटपणा करणारे सगळय़ा पक्षांचे नगरसेवक आपापल्या मुलामुलींना राजकारणात आणण्यासाठी न्यायालयाचा दिवसाढवळय़ा अपमान करीत आहेत. तरीही आम्ही सगळे त्यांनाच मत देणार आहोत. आम्ही सगळेजण किती नादान आहोत!

आता सगळय़ा सोसायटय़ांना नगरसेवक रंग लावून देतील. तिथल्या बागेत नवी बाके आणून देतील. वृद्धांना चारी धाम यात्रा घडवून आणतील. घरोघरी आता ज्यूटच्या पिशव्या पोहोचवल्या जातील. त्यावर आम्ही कुणाला मत द्यायचे आहे, ते अगदी ठळकपणे लिहिलेले असेल. घराच्या दारातला कचरा अनेक दिवस काढला गेला नाही, म्हणून नगरसेवकाचे उंबरे झिजवणारे आम्ही सगळे त्या पिशवीवरील नावे पाठ करून त्यांनाच मत देण्यात मुळीच कुचराई करणार नाही. आम्ही सगळेजण किती नादान आहोत!

रस्त्यावरचे खड्डे बुजत नाहीत आणि त्या खड्डय़ातून जाताना होणारा त्रास विसरण्यासाठीच तर सोसायटीतील बाकांवर बसण्याची सोय केली आहे, हे आम्हाला नक्की समजते. घरातल्या आजी-आजोबांना विरंगुळा केंद्रात जाण्याची सोय केल्याने सगळे घर कसे शांत शांत होते, हे आम्हाला समजत नाही का? कुणालाही मत दिले तरी त्याचा काही उपयोग नाही, हे कळत असूनही न वळणारे आम्ही सगळेजण परत त्याच त्या व्यक्तीला मत देतो, ते केवळ उपचार म्हणून. पुढच्या पाच वर्षांत तो पुन्हा फिरकणारही नाही, हे काय आम्हाला कळत नाही का? मत दिले काय आणि नाही दिले काय, आमचे हाल वाढतच जाणार आहेत. तरीही आम्ही त्यांनाच मत देणार आहोत. आम्ही सगळेजण किती नादान आहोत!

पुण्यातले रस्ते, त्यावरील पदपथ सुंदर करण्याच्या हव्यासापोटी कितीतरी कोटी रुपयांचा चुराडा झाला. प्रत्यक्षात त्या रस्त्यांच्या सौंदर्यीकरणात आमच्या नगरसेवकांची नावेच फलकांवर मोठ्ठय़ा अक्षरांत झळकत राहतात. पुन्हा पुन्हा पाहून एव्हाना आम्हाला ती नावे पाठ झाली आहेत. नगरसेवक महापालिकेत जाऊन नेमके काय करतात, हे आम्हाला ठाऊक नाही. ते समजून घेण्याची आमची इच्छाही नाही. त्यांच्या दारात वर्षां दोन वर्षांत मोटारी कशा काय उभ्या राहतात, हे आम्हाला कळत नाही. आम्हाला महापालिका ही सार्वजनिक हिताची कामे करणारी संस्था नसून पैसे वाटणारी बँक आहे, असेच वाटत आले आहे. पण म्हणून आम्ही बाकडी देणाऱ्याला किंवा घरात पिशव्या आणून देणाऱ्या व्यक्तीला मत द्यायचे नाही? आम्ही सगळेजण किती नादान आहोत!

आमच्या घरातला कचरा कुठे जातो, त्याचे काय होते, हे आम्हाला कळत नाही. शहरातून वाहणारी नदी दुर्गंधीने भरली आहे, त्यात सुधारणा करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून नदी पात्रच अरूंद करण्याची अफलातून कल्पना राबवू इच्छिणाऱ्या तमाम नगरपित्यांच्या ऋणात राहणे आम्हाला अधिक आवडते. या नदी पात्रात बांधकामे करून पूर आला तर काय होईल, याची आम्हाला चिंता नाही. गेल्या जवळजवळ वीस महिन्यांत पाऊस पडलाच नाही, असे झालेले नाही. मग या नदीचे काय होईल, याची चिंता आम्हाला वाटण्याचे कारण नाही. ज्याअर्थी काही सुंदर घडणार आहे, त्याअर्थी ते चांगलेच असणार आहे, यावर डोळे मिटून विश्वास ठेवणाऱ्या लाखो मतदारांपैकीच आम्हीही एक आहोत. होऊ दे खर्च, भरू दे कुणाचेही घर, यावर आमची श्रद्धा आहे.  शहराचे आणखी किती वाईट होते, तेच पाहायचे आहे आम्हाला.. आम्ही सगळेजण किती नादान आहोत!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lokjagar ignorant people ysh

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या