लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सोमवारी (१ ऑगस्ट) टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महापौर प्रशांत जगताप, ट्रस्टचे विश्वस्त आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमहापौर मुकारी अलगुडे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’ या लोकमान्यांनी केलेल्या सिंहगर्जनेचे शताब्दी वर्षांचे औचित्य या कार्यक्रमाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी दिली. या कार्यक्रमात टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे काढण्यात आलेल्या डॉ. दिलीप साठे यांच्या ‘मंडालेतील गीतारहस्य’ या पुस्तकाचे, कल्पना खरे संपादित ‘युगपुरुषाची स्मृतिपुष्पे’ या पुस्तकाचे आणि ‘केसरी’च्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanya tilak award to ncp chief sharad pawar
First published on: 25-07-2016 at 15:58 IST