दहावी आणि बारावी हे करिअर निवडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे टप्पे. केवळ सामाजिक प्रतिष्ठा आहे म्हणून दहावीनंतर विज्ञान शाखेत जायचे, किंवा मित्र मिळून ठरवतील तीच शाखा निवडायची हा सरधोपटपणा हळूहळू बदलत चालला आहे. मुले आणि पालकही करिअरच्या विविध संधी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांच्या पलीकडे असलेल्या अनेक करिअर संधी ‘लोकसत्ता’च्या ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतून उलगडल्या.

निर्णय घेण्यापूर्वी, निर्णय घेतल्यावर आणि अपयशी झाल्यानंतर लोकांच्या मनावर खूप ताण येतो. काही लोक निर्णय घेण्याच्या वेळी नेहमी घाबरलेले असतात. आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे ना, हे काहींना इतरांकडून वारंवार ऐकणे आवश्यक वाटते. अयशस्वी होण्याबद्दल खूप भीती वाटते. पण तो एक ‘स्टिग्मा’ असतो. एका परीक्षेतील अपयशावरून संपूर्ण करिअरची अयशस्विता ठरवणे चुकीचेच. एखाद्या गोष्टीची पुरेशी तयारी झालेली नसणे, प्रत्यक्ष कृतिविषयीच भीती वाटणे, वैयक्तिक इच्छेच्या अभावामुळे आळस असणे ही अपयशामागील प्रमुख कारणे.

– डॉ. रोहन जहागीरदार

आवाज देण्याच्या-अर्थात ‘व्हॉइसओव्हर’च्या क्षेत्रात भाषेवर प्रेम हवे. विविध प्रकारे आवाज काढून पाहता यायला हवेत, शिवाय संवाद साधण्याची आवड व हातोटी हवी. रेडिओवर ‘आरजे’ म्हणून काम करणे ही एक कलाच आहे. अनेक संस्था ‘आरजे’ होण्यासाठीचे अभ्यासक्रम सुरू करतात, परंतु डोळे मिटून त्यावर विसंबून राहू नका. एखाद्या कार्यशाळेस जाण्यापूर्वी शिकवणारी मंडळी किती अनुभवी आहेत, हे तपासून मगच निर्णय घेतलेला चांगला. वयानुसार आपला आवाज बदलतो हेही स्वीकारायला हवे. त्यामुळे या क्षेत्रात सतत स्वत:चे सिंहावलोकन करावे लागते.

– डॉ. अमित त्रिभुवन

क्रीडा क्षेत्रात क्रीडा प्रशिक्षक म्हणून उत्तम संधी मिळू शकते. परंतु त्यासाठी त्या खेळाबद्दल प्रेम आणि त्यात अनेक वर्षे मेहनत घेणे आवश्यक आहे. क्रीडा शिक्षकांच्याही संधी मिळू शकतात. मसाजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्रीडा मानसशास्त्रज्ञ अशी विविध करिअरसाठी क्षेत्रे खुली आहेत. ‘स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट’चे क्षेत्र नव्याने उदयास आले असून खेळाची पुरेपूर माहिती व त्याप्रती निष्ठा या गोष्टी असतील, तर हा मार्ग चोखाळता येईल. आपली आवड ओळखून क्रीडा समालोचन, क्रीडा पत्रकारिता, क्रीडा सांख्यिकी या क्षेत्रांचाही विचार करता येईल.

 – मिलिंद ढमढेरे

पालक जेव्हा शिकत होते त्या तुलनेत आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ‘इंटरनेट’ आणि त्याद्वारे उपलब्ध झालेल्या विविध संधी हा मोठा बदल आहे. जाहिरात क्षेत्र आणि त्याच्याशी निगडित कलात्मक क्षेत्रांमध्ये येण्यापूर्वी आपल्यात खरोखर कलात्मकता आहे का, वेगवेगळ्या कल्पना सुचून त्या मांडता येतात का, याचा विचार करायला हवा. ‘क्रिएटिव्हिटी’बरोबरच या क्षेत्रात ‘पॅशन’ देखील महत्त्वाचे आहे. जाहिरातीचा मजकूर लिहिणे (कॉपीरायटिंग), ‘क्लाएंट सव्‍‌र्हिसिंग’, अ‍ॅनिमेशन असे विविध पर्याय आहेत. समाजमाध्यमे हे देखील आता नोकरीच्या संधी देणारे साधन झाले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यावर आपण कसे व्यक्त होतो, समाजमाध्यमांवर टाकला जाणारा चांगला मजकूर (कंटेंट) कोणता हे आपल्याला कळते का, आपल्या ‘पोस्ट्स’ना आपण चांगल्या छायाचित्रांची जोड देऊ शकतो का, या गोष्टींमधून या क्षेत्रात स्वत:चा विकास साधणे शक्य आहे. यात उत्तम असणाऱ्यांना ‘सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह’ म्हणून काम करता येऊ शकेल. या क्षेत्रात स्पर्धा आहेच, शिवाय अनेक ठिकाणी नोकरीची सुरक्षितता देता येत नाही. आपल्यातील कलात्मकता जिवंत ठेवत कष्ट करत राहणे हे या क्षेत्रासाठी आवश्यक आहे.

– ऋग्वेद देशपांडे

‘नीट’ परीक्षेचा बागुलबुवा मानण्याचे कारण नाही. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या या परीक्षेत १८० प्रश्न असून ते १८० मिनिटांतच सोडवावे लागतात. शिवाय चुकलेल्या प्रश्नासाठी उणे गुणांची प्रणाली अवलंबली जाते. दहावी व बारावीच्या ‘एनसीईआरटी’च्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांच्या पुस्तकांचा परिपूर्ण अभ्यास ‘नीट’ साठी करावा. भौतिकशास्त्रात गणित लागते म्हणून बळेच गणित हा विषय घेण्याची जरुरी नाही. ‘नीट’ अभ्यासक्रमातील भौतिकशास्त्रात जे गणित असते ते साधारणत: १२ तासिकांमध्ये शिकवून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे अशा वेळी तेवढय़ाच गणिताचा अभ्यास करून पुरेल. आपण पुस्तकात जे वाचले ते आधी स्वत:ला कळेल अशा भाषेत आणा आणि नंतर त्याच गोष्टीचे विविध प्रकारे उपयोजन कसे करता येईल हे पाहा. ‘नीट’च्या वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये कमी वेळात प्रश्न समजून ज्ञानाचे असे उपयोजन करता येणे आवश्यक ठरते. अनेक जण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रालाच झुकते माप देऊन जीवशास्त्राचा अभ्यास शेवटी करतात. ‘नीट’मध्ये जीवशास्त्र हा हक्काचे गुण मिळवून देणारा विषय असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नको. ज्यांना ‘जेईई’ द्यायचीच नाही त्यांनी जेईईचे अधिक काठिण्यपातळीचे प्रश्न सोडवून सराव करण्याचे कारण नाही.

– डॉ. अतुल ढाकणे

अभियांत्रिकीसाठीच्या ‘जेईई’ प्रवेश परीक्षेची तयारी दहावीनंतरच सुरू करायला हवी. अभ्यासाला हाताशी दोन वर्षे असतील तर ही परीक्षा तितकीशी अवघड जाणार नाही. जेईई देताना अभ्यासक्रमातील अनेक गोष्टी मुळापासून समजलेल्या असणे आवश्यक ठरते. एखाद्या दिवशी विद्यार्थी वर्गात उपस्थित राहू शकला नाही, तर पुढच्या वर्गाच्या आधी बुडलेल्या अभ्यासक्रमाचे वाचन करून किंवा मित्रांकडून तो समजावून घेऊनच पुढे जाणे गरजेचे आहे. जेईई परीक्षेतील प्रश्न जरी वस्तुनिष्ठ असतील तरी थेट त्याच प्रकारे प्रश्न सोडवू नका. गणिते स्वत: सोडवून पाहणे, समजून घेणे आणि सराव करणे ही अभ्यासाची पद्धत चांगली. शिकलेले आत्मसात करता आले, तर त्यावर विचार करून वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याची विचारप्रक्रिया विकसित करता येईल. प्रश्नपत्रिका सोडवताना प्रथम ज्याची उत्तरे निश्चितपणे येतील तेच प्रश्न आधी सोडवा.

– अभय अभ्यंकर

शाळा घेत असलेल्या अंतर्गत परीक्षांमध्ये मिळणारे भरपूर मार्क, मुख्य परीक्षा खूप दिवस चालत असल्यामुळे त्या वेळीही अभ्यासाला मिळणारा वेळ आणि ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे गुण वाढतच चालले आहेत. न झेपलेल्या विषयाचे गुण अंतिम गुणांमध्ये धरलेच जात नाहीत. त्यांमुळे दहावीच्या गुणांच्या आधारे किंवा सर्व मित्र एखादी शाखा घेणार आहेत म्हणून तुम्हीही तीच शाखा निवडत असाल, तर तुमची निवड पद्धती चुकीची आहे. ‘अ‍ॅप्टिटय़ूट टेस्ट’ ही केवळ आवड पाहणारी परीक्षा असून आवडीबरोबर आपल्या क्षमतेची सांगड घालून करिअरचा विचार करायला हवा. आपल्याला अजिबात न आवडलेले वा न जमलेले विषय सोडून देण्याची संधी दहावीनंतर विद्यार्थ्यांना मिळते. त्या दृष्टीने आपल्या खूप आवडलेले व जमलेले विषय, मध्यम आवडलेले व जमलेले विषय आणि अजिबात न आवडलेले व न जमलेल्या विषयांची यादी करा. विज्ञान शाखेसह कला व वाणिज्य शाखांमध्येही करिअरच्या विविध संधी असून अनेक संधी माहितीच नसल्यामुळे दुर्लक्षिल्या जातात.

– विवेक वेलणकर

आरोग्याचाही मूलमंत्र

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांचा अभ्यास कसा करावा याच्या ‘टिप्स’ विद्यार्थ्यांना मिळाल्याच, शिवाय अभ्यास आणि करिअरच्या धबडग्यात मनाचे आरोग्य कसे राखावे याचा मूलमंत्रही तज्ज्ञांनी सांगितला.