ठाण्याचा अद्री दास,  नवी मुंबईच्या धात्रा मेहता, दीप्स्ना पांडा देशात तिसऱ्या स्थानी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या निकालात महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातून ठाण्याच्या न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलची अद्री दास, नेरुळच्या एपिजय स्कूलची दीप्स्ना पांडा आणि ठाण्याच्या रिलायन्स फाऊंडेशन स्कूलची धत्री मेहता यांनी ४९७ गुणांसह देशपातळीवर तृतीय क्रमांक मिळवला. दहावीचा राष्ट्रीय पातळीवरील निकाल ९१.१० टक्के लागला असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकालात ४.४० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.

‘सीबीएसई’ने देशभरातील दहा विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाच्या निकालात जवळपास दीड टक्क्य़ांनी वाढ झाली. चेन्नई विभागाचा निकाल ९९ टक्के लागला. गेल्या वर्षीचा निकाल ९७.३७ टक्के होता. राष्ट्रीय पातळीवरील विभागनिहाय निकालात त्रिवेंद्रम विभागाने आघाडी घेतली. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल ९९.८५ टक्के लागला. चेन्नई विभागाने ९९ टक्क्यांसह द्वितीय, तर अजमेर विभागाने ९५.८९ टक्क्य़ांसह तृतीय स्थान प्राप्त केले. दर वर्षीप्रमाणेच यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २.३० टक्क्य़ांनी जास्त आहे.

विविध विभागांतील १३ विद्यार्थ्यांनी ४९९ गुणांसह संयुक्तरीत्या पहिला क्रमांक पटकावला. त्यात नोएडाच्या लोटस व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचा सिद्धांत पेनगोरिया, नोएडाच्याच बालभारती पब्लिक स्कूलचा दिव्यांश वाधवा, जौनपूरच्या सेंट पॅट्रिक्स स्कूलचा योगेशकुमार गुप्ता, गाझियाबादच्या एसएजे स्कूलचा अंकुर मिश्रा, मेरठच्या देवान पब्लिक स्कूलचा वत्सल वष्ण्र, भटिंडाच्या सेंट झेवियर स्कूलची मान्या, जामनगरच्या नंद विद्या निकेतनचा आर्यन झा, जयपूरच्या सेंट अँजेला सोफिया स्कूलची तरू जैन, पलक्कडच्या पालघाट लायन्स स्कूलची भावना शिवदास, गाझियाबादच्या छबिलदास पब्लिक स्कूलचा इश मदान, अंबालाच्या कॉन्व्हेंट ऑफ जिझस अँड मेरी स्कूलचा दिवज्योत कौर जग्गी, गाझियाबादच्या उत्तम स्कूलची अपूर्वा जैन, नोएडाच्या मयूर स्कूलची शिवानी लाथ यांचा समावेश आहे. विशेष वर्ग आणि अपंग वर्गातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९५.९९ टक्के आहे. त्यात दिलवीन प्रिन्स याने ४९३ गुणांसह प्रथम, सावन विशोयने ४९२ गुणांसह द्वितीय आणि आयरेने मॅथ्यूज हिने ४९१ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

पहिल्या तीन क्रमांकांसाठी तब्बल ९७ विद्यार्थी

राष्ट्रीय पातळीवरील निकालात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चुरस असल्याचे दिसून आले. त्यामुळे ४९९ गुण मिळवलेल्या १३ विद्यार्थ्यांना प्रथम, ४९८ गुण मिळवलेल्या २५ विद्यार्थ्यांना द्वितीय आणि ४९७ गुणांसाठी ५९ विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांक विभागून द्यावा लागला. त्यामुळे पहिले तीन क्रमांक ९७ विद्यार्थ्यांमध्ये विभागले गेले. पहिला क्रमांक मिळवलेल्या १३ विद्यार्थ्यांमध्ये सात मुले आणि सहा मुलींचा समावेश आहे.

गुणवंतांमध्ये दुपटीने वाढ : गेल्या वर्षी २७ हजार ४७६ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक, १ लाख ३१ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवले होते. यंदा हे प्रमाण दुप्पट झाले. यंदा ५७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक, तर २ लाख २३ हजार १४३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवले.

एकूण शाळा – १९ हजार  २९८

परीक्षा केंद्रे – ४ हजार ९७४

परीक्षा दिलेले विद्यार्थी – १७ लाख ६१ हजार ७८

उत्तीर्ण विद्यार्थी – १७, ४४२८

उत्तीर्ण मुली – ९२.४५ टक्के

उत्तीर्ण मुले – ९०.१४ टक्के

९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी – ५७ हजार २५६

९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी – २,२३,१४३