पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी विजेचा प्रवाह उतरून किंवा वादळामुळे वीजवाहिन्या तुटल्याने, शॉर्टस र्किट झाल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी विजेबाबत विशेष दक्षता घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाड किंवा दुर्घटनेबाबत महावितरणचे टोल फ्री क्रमांक २४ तास सुरू ठेवण्यात आले आहेत.
अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या विजेच्या तारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फयूज बॉक्स, त्याचप्रमाणे घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्यास दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळणे सहज शक्य आहे. मुसळधार पाऊस व वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठय़ा फांद्या तुटून त्या वीजतारांवर पडतात. झाडे पडल्याने वीजखांबही वाकू शकतो. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध रहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन ‘महावितरण’ कंपनीने केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १८००-२००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे क्रमांकावर ग्राहकांना तक्रार देता येते. वीजसेवेच्या तक्रारीबरोबरच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठय़ात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटनेची शक्यता असणारी ठिकाणेही ग्राहकांनी कळवावीत.
विजेबाबत काय दक्षता घ्याल-
– पावसाळ्यात घरातील स्विचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
– घरातील वीजपुरवठय़ाला आवश्यक अर्थिग असल्याची खात्री करून घ्या.
– घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्विच तत्काळ बंद करावा.
– घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावेत.
– ओल्या कपडय़ांवर विजेची इस्त्री फिरवू नये.
– विजेचे स्विचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्या.
– विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्विचबोर्डापासून बंद करावीत.
– पत्र्याच्या घरात राहणाऱ्यांनी विजेबाबत अतिदक्षता बाळगावी.
– विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत किंवा दुचाकी वाहने टेकवून ठेवू नयेत.
– विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2014 रोजी प्रकाशित
पावसाळ्यात विजेबाबत सतर्क राहा!
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी विजेचा प्रवाह उतरून किंवा वादळामुळे वीजवाहिन्या तुटल्याने, शॉर्टस र्किट झाल्याने अपघात होण्याची शक्यता असते.

First published on: 31-07-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran short circuit accident