कृषिपंपांना कमी दरामध्ये वीजपुरवठा केला जात असल्याने यापुढे कृषिपंपांच्या वीजबिलांची थकबाकी होऊ न देण्याचे धोरण ‘महावितरण’कडून आखण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभरात कृषिपंपाच्या थकबाकीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. पुणे विभागामध्ये आजवर आठ हजारांहून अधिक कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
ग्राहकांपर्यंत वीज नेण्यासाठी ‘महावितरण’ला प्रतियुनिट ५.५६ रुपये खर्च येतो. कृषिपंपांना एक रुपयांपेक्षाही कमी दराने वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे यापुढे कृषिपंपाची थकबाकी वाढू न देण्याबरोबर असलेली थकबाकी पूर्णपणे वसूल करण्याचे लक्ष्य ‘महावितरण’ने ठेवले आहे. त्यासाठी राज्यभरातील सर्व विभागामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी या मोहिमेला विरोधही होत आहे. मात्र, थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे.
पुणे परिमंडलामध्ये राजगुरुनगर, मुळशी व मंचर या विभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे. एप्रिल २०१२ ते जून २०१३ या कालावधीतील कृषिपंपांची सर्व थकीत वीजबिलांची वसुली करण्याचे लक्ष्य ‘महावितरण’ला देण्यात आले आहे. त्यानुसार या विभागांमध्ये कारवाई सुरू आहे. कारवाईदरम्यान सुमारे आठ हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मोहीम सुरू झाल्यापासून आठ हजार ६७६ कृषिपंपधारकांनी तीन कोटी ८६ लाखांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. मुळशी, राजगुरुनगर, मंचर विभागातील ५९ हजार ७८१ कृषिपंपधारकांकडे सुमारे ४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.