वीजजोड देण्याच्या प्रकरणात चार अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर कंपनीची प्रतिमा सावरण्यासाठी ‘महावितरण’ आता खडबडून जागे झाले आहे. प्रशासकीय दिरंगाईबरोबरच ग्राहकांच्या इतर तक्रारी आता थेट परिमंडलस्तरावर स्वीकारण्यात येणार असून, या तक्रारींची दखल मुख्य अभियंता स्वत: घेणार आहेत. पुणे विभागात कार्यालयीन वेळेत तक्रारी नोंदविण्यासाठी ०२०-२६१३५७४० हा दूरध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.
पद्मावती विभागातील चार अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी वीजजोड प्रकरणात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर ‘महावितरण’च्या व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. लाचखोरीच्या या प्रकरणामुळे कंपनीच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसला आहे. या पाश्र्वभूमीवर ‘महावितरण’च्या वतीने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याविषयीची नवी यंत्रणा जाहीर केली आहे. नवीन वीजजोडणी, नवीन किंवा वाढीव वीजभार मंजुरी आदींबाबत दिरंगाई झाल्यास किंवा अन्य अडचणी येत असल्यास पुणे परिमंडलातील ग्राहकांसाठी थेट परिमंडळस्तरावर तक्रार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या तक्रारींची दखल मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर हे स्वत: घेतील, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.
सर्वच वर्गवारीतील नवीन वीजजोडासाठी www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यास शहरी भाग सात व ग्रामीण भागात १० दिवसांत संबंधित ग्राहकांशी संपर्क साधला जातो. या भेटीत जागेची पाहणी त्याचप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करण्यात येते. गणेशखिंड मंडलातील कोथरूड, शिवाजीनगर, पिंपरी, भोसरी विभागातील ग्राहकांसाठी मागेल त्यांना घरपोच वीजजोडणी योजनाही सुरू आहे. ग्राहकांना नवी वीजजोडणी हवी असल्यास १८००२३३९११९ या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी केल्यानंतर पुढील प्रक्रिया घरपोच होईल. वीजजोडासाठी लागू असलेल्या दरपत्रकांचे माहितीपत्रक सर्व कार्यालयात लावण्यात आले आहे. वीजजोडणीबाबत काही अडचण असल्यास १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधा
एक खिडकी ग्राहक सुविधा केंद्रात वीजजोडणीबाबतच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलब्ध असून, या प्रक्रियेसाठी ‘महावितरण’च्या इतर कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. नवी वीजजोडणी, वीजभार मंजुरी, नावात बदल आदीसाठी पद्मावती, रास्ता पेठ, नगर रस्ता, पर्वती व बंडगार्डन विभागातील ग्राहकांनी रास्ता पेठ येथील ग्राहक सुविधा केंद्रात (दूरध्वनी २६११९६८८) संपर्क साधावा. कोथरूड, शिवाजीनगर विभागातील ग्राहकांनी कोथरूड ग्राहक सुविधा केंद्रात (दूरध्वनी २५४५२३२०), तर पिंपरी, भोसरी विभागातील ग्राहकांनी पिंपळे सौदागर येथील ग्राहक सुविधा केंद्रात (दूरध्वनी २७२०१११२) संपर्क साधावा.