पुण्यातील हजारो मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना मतदान करू द्यावे या मागण्यांसाठी महायुतीचे उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी शुक्रवारपासून सुरू केलेले उपोषण सायंकाळी थांबवण्यात आले. या तक्रारीबाबत शिरोळे यांना शनिवारी केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी चर्चेसाठी दिल्लीत बोलावले आहे.
मतदार याद्यांमधील गोंधळाबाबत समाधानकारक खुलासा न झाल्यास उपोषणाचा इशारा शिरोळे यांनी गुरुवारी रात्री दिला होता. त्यानुसार आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, चंद्रकांत मोकाटे, भीमराव तापकीर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले, माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या उपस्थितीत त्यांनी शुक्रवारी सकाळी विधान भवनाबाहेर उपोषणाला सुरुवात केली. सामाजिक कार्यकर्त्यां विनिता देशमुख यांनीही याद्यांमधील घोळांच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. मतदान करता न आलेले नागरिकही या ठिकाणी दिवसभर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत मतदान केले होते, पत्ताही बदललेला नाही, मग यावेळी यादीत नाव का नाही, अशी विचारणा हे नागरिक करत होते. नागरिकांच्या तसेच राजकीय पक्षांच्या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाने दिवसभरात दखल घेतली नाही. जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे ई मेल व अन्य माध्यमांमधून तक्रारी केल्या.
तक्रारींबाबत जिल्हा प्रशासनाकडून सायंकाळपर्यंत कोणतेही निवेदन करण्यात आले नाही. मात्र, त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी संपर्क साधून शिरोळे यांच्या तक्रारीबाबत शिष्टमंडळाला शनिवारी भेट देण्याचे मान्य केले. त्यानुसार शिरोळे, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे आणि अजय भोसले हे शनिवारी दिल्लीला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या घोषणेनंतर शिरोळे यांनी उपोषण मागे घेतले.
मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून निवेदन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनीही निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन वंचितांना मतदान करू द्या अशी मागणी केली. पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मतदारांची नावे गायब होण्याच्या प्रकाराची कसून चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी दिले आहे. मतदानापासून वंचित राहिलेल्यांना मतदान करता येईल का याची पडताळणी तातडीने करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम आणि शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानेही निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
प्रदेश भाजपचे मुंबईत निवेदन
भाजपचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्रीकांत भारतीय यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना प्रदेश भाजपतर्फे निवेदन दिले. पुण्यातील या प्रकरणाचे गांभीर्य केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे गद्रे यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.