पिंपरी: मोशीतील कचरा डेपोला भीषण आग लागली. मात्र, ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याची शंका व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. राजकीय नेते, अधिकारी व ठेकेदारांनी मिळून केलेले गैरप्रकार लपविण्यासाठी आग लावण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासक राजेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून गोळा करण्यात येणारा कचरा जिथे ठेवण्यात येतो, त्या महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला बुधवारी सायंकाळी आग लागली. आगीच्या ज्वाळा दूपर्यंत दिसत होत्या. अग्निशामक दलाच्या अग्निबंबांनी अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणली. वास्तविक, दुपारी आग लागली असतानाही अग्निशामक दलाला पाच तासानंतर ही वर्दी देण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यानच्या काळात कचरा डेपोत नेमके काय झाले, यावरून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. पर्यावरण विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित होता. इतर काही करण्याआधी प्रसारमाध्यमांचा कोणीही प्रतिनिधी तेथे जाऊ नये, यासाठीच त्याचा आटापिटा दिसून येत होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकारांना सांगितले,की आगीची घटना संशयास्पद आहे. कोटय़वधी रुपयांची कामे न करताच देयके वसूल करण्यात आली आहेत. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांना व त्यांना पोसणाऱ्या भाजपच्या नेत्यांना वाचविण्यासाठी ही आग लावण्यात आली असावी, असा आमचा संशय आहे. त्यामुळे आगीची चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही.