विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी-देहू येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारी या जगातील एकमेवाद्वितीय परंपरेची आणि पंढरीचे माहात्म्य कथन करणारी वेगवेगळ्या भाषा आणि लिपींमधील दुर्मिळ हस्तलिखिते अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहेत. विविध १५ हस्तलिखितांच्या पानापानांत दडलेला भागवत संप्रदायाचा आनंद ठेवा अभ्यासकांच्या दुर्लक्षामुळे पडून आहे.
मराठी हस्तलिखित सूची केंद्रामध्ये संस्कृत, मराठी, कन्नड, तमीळ, तेलगू भाषांमध्ये असलेली ही हस्तलिखिते जतन करण्यात आली आहेत. मात्र, त्यांचा अभ्यास करण्यासाठी कोणी अभ्यासक पुढे येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने ओवी वृत्तामध्ये तर, काही िदडी वृत्तामध्ये असलेल्या या हस्तलिखितांपैकी काही हस्तलिखितांची मराठी संस्करणेदेखील उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथे ही हस्तलिखिते लिहिलेली आहेत. या हस्तलिखितांपैकी संस्कृतमध्ये तीन, तमीळ, कन्नड आणि तेलगू भाषेत प्रत्येकी एक, तर उर्वरित मराठीमध्ये आहेत. संस्कृतमधील हस्तलिखितांना स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णूपुराणाचा आधार आहे. ‘बाळकव्यास’ कृत ‘पंढरीमाहात्म्य’ हे आकाराने सर्वात मोठे हस्तलिखित आहे. या हस्तलिखितामध्ये १२ अध्यायांसह ३,९६० ओव्या आहेत. तर, हरी दीक्षितकृत आणि गिरिधरकवीकृत पंढरीमाहात्म्याची केवळ सात-आठ पानेच उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती या केंद्राचे प्रमुख आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांनी दिली.
पंढरीमाहात्म्य कथन करणाऱ्या या सर्व हस्तलिखितांच्या प्रती उपलब्ध होणे गरजेचे आहे. या हस्तलिखितांचा तुलनात्मक अभ्यास करून चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी मंजूळ यांनी केली आहे. ‘पंढरीमाहात्म्य’ या विषयावर पीएच. डी. करणारे अभ्यासक पुढे यावेत, अशी अपेक्षा मंजूळ यांनी व्यक्त केली.