एका ग्रामीण वृद्ध स्त्रीच्या जगण्यात एका लहानशा घटनेने उडालेली खळबळ, सून आणि मुलाच्या वादात सुनेची बाजू घेणारी सासू आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेल्या मुखवटय़ामागचे वास्तव, एका गावाच्या जमिनींवर डोळा असलेल्यांनी घेतलेला त्या गावाचा घास.. रोजच्या जगण्याशी निगडित असलेले नवीन विषय मांडणारे ‘एक हजाराची नोट’, ‘तिचा उंबरठा’, ‘आभास’ आणि ‘साम दाम दंड भेद’ या मराठी चित्रपटांचा प्रवास बुधवारी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ (पिफ)त उलगडला. या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.
साध्या आयुष्यातील नाटय़ पकडणारी ‘एक हजाराची नोट’!
‘लोकसत्ता’मध्ये चालवल्या जाणाऱ्या ‘दोन फुल एक हाफ’ या सदरात ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटातल्या ‘बुढी’ची कथा सापडली, असे निर्माते शेखर साठे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ पत्रकार श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई) यांनी ‘एक हाफ’मध्ये या म्हातारीची लहानशी गोष्ट लिहिली होती. त्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट होऊ शकेल असे दिग्दर्शक श्रीहरी साठे यांना वाटले. साध्या माणसाच्या आयुष्यात एका नोटेमुळे काय नाटय़ घडू शकते, हे त्यातील मार्दव जपत पडद्यावर मांडणे हे मोठे आव्हान होते.’’
निवडणुकांपूर्वी उमेदवारांकडून मतदारांना आमिषे दाखवली जात असताना ‘बुढी’लाही एक हजार रुपयांची नोट मिळते. त्या हजार रुपयांनी बुढीचे आयुष्य बदलून जाण्यासारखी परिस्थिती असतानाच  अनपेक्षितपणे नोट खोटी निघते आणि तिला काही अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागते, असा या कथेचा गाभा आहे. अभिनेत्री उषा नाईक यांनी बुढीची प्रमुख भूमिका साकारली असून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या धनगर मुलाची भूमिका अभिनेते संदीप पाठक यांनी रंगवली आहे. मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘मराठी सिनेमा गल्ला किती जमवतो या पेक्षा तो अधिक दिवस चित्रपटगृहात कसा टिकेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘देऊळ’, ‘पुणे ५२’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले अभिनेते श्रीकांत यादव या चित्रपटात पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत. यादव म्हणाले, ‘‘ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव असूनही मला ‘एक हजाराची नोट’मध्ये काम करणे अवघड वाटले. वऱ्हाडी भाषा बोलण्याचा मला मुळीच सराव नव्हता. त्यामुळे आमच्या आख्ख्या युनिटसाठी नागपूरहून वैदर्भीय शैलीची मराठी शिकवणारे शिक्षक आणण्यात आले. सर्व कलाकारांनी त्यांच्या हाताखाली त्या बोलीचे धडे गिरवले.’’ अद्ययावत तंत्र वापरतानाच कथेतला साधेपणा हरवू न देणे हेही अवघड होते, असे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्षातली आईच पडद्यावरची सासू!
दिग्दर्शक प्रदीप घोणसीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तिचा उंबरठा’ या चित्रपटात अभिनेत्री ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या प्रत्यक्षातल्या माय-लेकी सासू आणि सुनेच्या भूमिकेत आहेत. अभिनय करताना सासू-सुनेचे हे नाते सतत लक्षात ठेवावे लागल्याचे तेजस्विनी यांनी सांगितले. हा चित्रपट काही वर्षांपूर्वी रंगमंचावर गाजलेल्या ‘माझं घर’ या जयंत पवार यांनी लिहिलेल्या व्यावसायिक नाटकावर बेतलेला आहे. सून आणि मुलगा यांच्यात दुरावा निर्माण झाल्यावर सुनेची बाजू घेणारी सासू आणि आपणच आखून घेतलेल्या सीमारेषांच्या बाहेर पडून यश मिळवणारी सून या कथेत बघायला मिळणार आहे. ज्योती चांदेकर म्हणाल्या, ‘‘मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माझं घर’ नाटकातही मीच काम केले होते. सहसा आईचा कल सुनेपेक्षा आपल्या मुलाकडेच असलेला बघायला मिळतो. याला छेद देणाऱ्या कथेमुळे ते नाटक गाजले होते.’’
एका रात्रीत घडणाऱ्या कथेचे संकलनही रात्रीच!
‘आभास’ या गजानन कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची कथा एका रात्रीत घडते. माणसाच्या मुखवटय़ामागचे चेहरे, ऐकीव श्रद्धा आणि त्यातून घडणारा मनोव्यापाराचा खेळ याचे चित्रण या कथेत असून अभिनेते अंकुश चौधरी यांनी त्यात प्रमुख भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वातावरणाचा अनुभव चित्रपटात अचूक यावा यासाठी संकलक संतोष जिवणगीकर यांनी त्याचे संकलनही सलग २१ रात्रींमध्ये केले आहे. या चित्रपटाची कथाही कुलकर्णी यांना एका रात्री मोटारीचा अपघात झाला असताना सुचली आहे. ते म्हणाले, ‘मी एका मित्राबरोबर प्रवास करत असताना गाडीला अपघात झाला आणि रात्रभर आम्हाला मदत मिळाली नाही. त्या वेळी मनात आलेल्या भीतीच्या विविध कल्पनांचा या चित्रपटात समावेश आहे.’