केवळ साहित्य संमेलनांचे आयोजन वगळले तर मराठी भाषा आणि वाङ्मय यासाठी साहित्य महामंडळ नेमके काय करते, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्नच साहित्य महामंडळ सदस्यांनाही पडला आहे. घुमान संमेलनातील खुपणाऱ्या गोष्टींबरोबरच या प्रश्नाच्या विचारणेसह महामंडळाच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचे रविवारी कान टोचले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये घुमान साहित्य संमेलनाचा सविस्तर आढावा घेत हे संमेलन यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली. संमेलनातील कार्यक्रमामध्ये महामंडळ अध्यक्षांना दोन वेळा करावे लागलेले सूत्रसंचालन, सदस्यांना झालेला सुरक्षाव्यवस्थेचा त्रास या विषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. महामंडळाच्या सदस्य असलेल्या व्यक्तींनी आपण काम करीत असलेल्या अन्य संस्थांना कोणत्याही स्वरूपाचे लाभ देऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त करून भविष्यात या बाबीचे पालन केले जावे याकडेही लक्ष वेधले. घुमान संमेलनासंदर्भात महामंडळाला कमीपणा आणणारे कृत्य घडले असल्याचेही एकाने निदर्शनास आणून दिले.
मराठी भाषा आणि वाङ्मयाच्या प्रसाराबरोबरच या क्षेत्रात मूलभूत काम साहित्य महामंडळाकडून होत नसल्याबद्दलही बैठकीमध्ये नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे महामंडळ केवळ साहित्य संमेलन घेते हा समज खरा होत असून भाषा आणि वाङ्मयाच्या क्षेत्रात काम करण्याविषयी केवळ ठराव केले जातात. मात्र, त्याची कार्यवाही होत नाही. सीमावर्ती भागामध्ये मराठी भाषा, वाङ्मय आणि संस्कृतीविषयीचे प्रश्न गंभीर असून त्याविषयी महामंडळाने ठोस उपाययोजना करावी, असा सूर सदस्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onमराठीMarathi
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi sahitya mahamandal language
First published on: 18-05-2015 at 03:09 IST