क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ३ ते ५ जानेवारी या काळात सासवड येथे ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. पाच परिसंवाद, लेखक आणि कवी अशा दोन मुलाखती, दोन कविसंमेलने, ‘झेंडूची फुले’ हा विडंबन कवितांवर आधारित कार्यक्रम, कथाकथन हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे. सासवडच्या रूपाने साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांची जन्मभूमी व संत सोपानदेव यांच्या समाधीच्या गावात हे संमेलन होत आहे.
‘प्रश्न आजचे, उत्तरे संतांची’, ‘मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली’, ‘माध्यमांतर’, ‘छंदोबद्ध मराठी कविता हरवत चालली आहे का’, ‘राजकीय घडामोडी आणि मराठी साहित्य’ हे संमेलनातील परिसंवादांचे विषय ठरविण्यात आले आहेत. याखेरीज बाल आनंद मेळा, अभिजात कथांचे वाचन, ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम, दोन सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शन समितीने सुचविलेल्या कार्यक्रमांसंदर्भात साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. सासवड येथील संमेलनाचे निमंत्रक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार या वेळी उपस्थित होते.
संमेलनासाठी दीड हजार रुपये प्रतिनिधी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनामध्ये दोनशे गाळ्यांचा समावेश असून पाच दिवसांसाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. एका प्रकाशकाला चार गाळे देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. नेहरू स्टेडियमपासून संमेलनस्थळी जाण्यासाठी विशेष बसेसची सुविधा देण्यात येणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. सासवड येथील पालखी तळाचे मैदान, दौलत चित्र मंदिर, आचार्य अत्रे सभागृह आणि नगरपालिकेचे सभागृह अशा चार ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती रावसाहेब पवार यांनी दिली.
ग्रंथदिंडीऐवजी ग्रंथघोष
दरवर्षीच्या संमेलनातील ग्रंथदिंडी या पंरपरेऐवजी यंदाच्या संमेलनापासून ग्रंथघोष हा नवा पायंडा सुरू करण्यात येणार आहे. सासवड परिसरातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी यांच्यासह साहित्यप्रेमी नागरिक पालखी तळावरील मुख्य मंडपामध्ये पालखीमध्ये ठेवण्यात आलेल्या ग्रंथांचे पूजन झाल्यावर संतवचने, देशभक्तीवर गीते यांचा समूह स्वरांत घोष करणार आहेत, अशी माहिती डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi sahitya sammelan at saswad from 3rd jan to 5th jan
First published on: 18-08-2013 at 02:40 IST