शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीचा पास मोफत मिळाला पाहिजे आणि ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा शिवसेनेतर्फे मंगळवारी देण्यात आला.
खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना दिली जात असलेली मोफत पासची सवलत या वर्षीपासून बंद करण्यात आली असून ती पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा या वेळी पक्षातर्फे देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती या मोर्चात होती. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहर प्रमुख विनायक निम्हण, महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ, शहर संघटक श्याम देशपांडे, सचिन तावरे, महादेव बाबर आणि पक्षाच्या नगरसेवकांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत पास ही योजना शिवसेनेने सुरू केली होती. ती बंद करण्यात आली असली, तरी ही योजना पुन्हा सुरू होईपर्यंत शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. सर्वसामान्य शालेय विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाबाबत सत्ताधारी पक्ष चर्चा करण्याचे टाळत असल्याचीही तक्रार शिवसेनेने केली आहे. विद्यार्थ्यांसाठीची पास सवलत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने आयुक्त कुणाल कुमार आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांची मंगळवारी भेट घेऊन त्यांना निवदेन सादर केले. विद्यार्थी पासची योजना गुंडाळण्याचा जो निर्णय झाला आहे तो रद्द करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2015 रोजी प्रकाशित
विद्यार्थी पासच्या मागणीसाठी शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा
शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीचा पास मोफत मिळाला पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

First published on: 08-07-2015 at 03:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March by shivsena regarding student pass