‘‘प्राणी, पक्षी, तळी अशा क्षेत्रांमध्ये फार कमी लोक काम करताना दिसतात. टीव्ही आणि मोबाईलमध्ये अडकलेल्या लोकांना पर्यावरणासाठी वेळही नाही. पण अंतज्र्ञानाचा दरवाजा या ‘हिरव्या’ बटणानेच उघडू शकतो! आपण कशाकरता जगतो याचे उत्तर निसर्गात सापडते,’’ असे मत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
‘अॅड- व्हेंचर फाउंडेशन’तर्फे देण्यात येणारा ‘मारुती चित्तंपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ कुलकर्णी यांना मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला; या वेळी कुलकर्णी बोलत होते. पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे, संस्थेचे अध्यक्ष विवेक देशपांडे, चिंतामणी केळकर, प्रसाद देशपांडे या वेळी उपस्थित होते.
माळढोक पक्ष्यावर कुलकर्णी यांचा विशेष अभ्यास आहे. पक्ष्यांचा अभ्यास करताना आलेले विविध अनुभव सांगून ते म्हणाले, ‘‘निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देताना कधीकधी नाउमेद व्हायला होते. लोकांमध्ये पर्यावरणाचे फारसे प्रेम दिसत नाही. मी पक्ष्यांवर लिहितो असे सांगितल्यावर एकाने मला ‘काँग्रेसवर लिहिता की भाजपवर,’ असाही प्रश्न विचारला होता! परदेशापेक्षाही आपल्या राज्यातील पक्षिवैभव श्रेष्ठ आहे. टीव्ही आणि मोबाईलमध्ये अडकलेल्यांना आज पर्यावरणासाठी वेळ नाही. पण आपण कशाकरता जगतो याचे उत्तर निसर्गात सापडते.’’
माळढोक पक्ष्याला पर्यावरणातील त्याची जागा पुन्हा मिळवून देणे हे वनखात्याचे उद्दिष्ट असल्याचे लिमये यांनी सांगितले. ‘माळढोकला परत आणण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच नान्नजमध्ये माळढोकची लक्षणीय संख्या दिसू लागेल,’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti chittampalli award to ormithologist b s kulkarni
First published on: 24-11-2014 at 03:15 IST