शिवसेनेच्या संपर्कनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे व खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यातील तीव्र वादाची दखल मातोश्रीवरून घेण्यात आली. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर डॉ. गोऱ्हे यांच्याकडे असलेली शिरूर लोकसभा कार्यक्षेत्राची जबाबदारी काढून घेण्यात आली असून त्यांना पुणे व मावळ लोकसभेचे काम पाहण्यास सांगण्यात आले आहे.
शिवसेनेने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षात निर्णायक बदल करण्यास सुरुवात केली आहे. डॉ. गोऱ्हे यांच्याकडील जबाबदारी कमी करणे हा त्याचाच महत्त्वाचा भाग मानला जातो. खासदार आढळराव व गोऱ्हे यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र मतभेद आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. शिरूर मतदारसंघातील निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, अशी तक्रार आढळराव यांनी ठाकरे यांच्याकडे केली होती. काहीशा नाराज असलेल्या आढळराव यांची ताकद पाहता त्यांना दुखावणे योग्य नसल्याने त्यांच्या तक्रारीची दखल ठाकरे यांनी घेतली व डॉ. गोऱ्हे यांच्याकडून शिरूरची जबाबदारी काढून घेण्यात आली. यापुढे शिरूरसह बारामती लोकसभा मतदारसंघाची संपर्कनेत्याची जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्याकडे राहणार असून गोऱ्हे यांच्याकडे पुणे व मावळ लोकसभेच्या संपर्कप्रमुखाची जबाबदारी राहणार आहे.
दरम्यान, पुण्यात शिवसेना भवनात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेने उद्योग, व्यापार, वकील, शिक्षण, डॉक्टर, विद्यार्थी असे विविध सेल निर्माण करून ते पक्षाबरोबर जोडून घ्यावे. सर्व बाजूने पक्षाचा विस्तार करावा, अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली. शाखाप्रमुख पदासाठी इच्छुक असलेल्या शिवसैनिकांच्या या वेळी मुलाखती घेण्यात आल्या.