डॉ. लागू यांच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या सुनंदा चव्हाण यांची आठवण

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू हे सर्वासाठी आदराचे व्यक्तिमत्त्व. मात्र, एका महिलेसाठी ते घरातील ज्येष्ठ म्हणजे दादा होते. आमच्या दादांना केवळ गोड पदार्थच प्रिय होते, अशा शब्दांत सुनंदा चव्हाण यांनी डॉ. लागू यांच्या आठवणी जागविल्या. गेल्या दहा वर्षांपासून सुनंदा चव्हाण या डॉ. लागू यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करीत आहेत.

दादांचे कधी रागावणे किंवा चिडणे नाही. ते तिखट फारसं खायचे नाहीत. पण जेवण झाल्यानंतर त्यांना हमखास गोड पदार्थ हवे असायचे. शंकरपाळी, शिरा, बासुंदी हे त्यांचे अत्यंत आवडते पदार्थ.. हे सांगताना सुनंदा चव्हाण यांचे अश्रू थांबत नव्हते. किती सांगू किती नको असं झाले आहे. पण आता केवळ आठवणीच राहिल्या आहेत.

‘दादा’ आणि ‘ताई’ म्हणजे दीपा श्रीराम हे दोघे मला आई-वडिलांसमानच होते. घरातील कुटुंबाचे सदस्य असल्यासारखीच मला या घरामध्ये वागणूक मिळत होती, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. पिंपळे गुरव येथून सकाळी अकरा वाजता आल्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्या घरी जात. दादांना माझ्या हातचा स्वयंपाक अधिक आवडायचा. मंगळवारी (१७ डिसेंबर) मी त्यांना जाण्यापूर्वी थालीपीठ करून दिले होते. दिवसभर छान गप्पा मारत होते. घरी जाताना नेहमीप्रमाणे त्यांना ‘दादा’ जाऊ  का? असे विचारले असता ‘तू का चालली’ असे सारखे म्हणत होते. नंतर असे घडेल याची कल्पनाही नव्हती, असे सुनंदा यांनी सांगितले.

‘देव न मानणारा देवमाणूस’ :  डॉ. लागू यांच्या चालकाची भावना

नित्यनेमाप्रमाणे संध्याकाळी फिरायला नेऊन घरी आणल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांना मी अखेरचे पाहतो आहे असे वाटलेच नाही. मात्र, थोडय़ाच वेळात त्यांना त्रास झाला आणि होत्याचे नव्हत्यामध्ये रूपांतर झाले. डॉ. श्रीराम लागू म्हणजे ‘देव न मानणारा देवमाणूस’, अशा शब्दांत बबन माझिरे यांनी भावना व्यक्त करीत अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

बबन माझिरे हे २५ वर्षांपासून डॉ. लागू यांच्याकडे मोटारीचे चालक म्हणून काम करत आहेत. ते रोज सायंकाळी डॉ. लागू यांना ‘एआरएआय’जवळील वेताळ टेकडी येथे फिरायला नेऊन आणण्याची जबाबदारी अगदी मुलाप्रमाणे बजावत. गेल्या काही वर्षांत डॉक्टरांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरू होता. मात्र, मंगळवारी असे घडेल असे वाटले नाही. डॉ. लागू यांना फिरायला नेऊन घरी आणले.  काम संपवून मी घरी गेलो. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली असल्याचा दीपाताई यांचा दूरध्वनी आला. मी येथे पोहोचेपर्यंत डॉक्टर निघून गेले असल्याची बातमी समजली, असे माझिरे म्हणाले.