या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

|| सुहास जोशी

देशभरातील ७७ अधिवासांसाठी पहिलाच अभ्यास प्रकल्प :– स्थलांतरित पक्ष्यांच्या मध्य आशियाई स्थलांतर मार्गाचे (सेंट्रल आशियाई फ्लाय वे) संवर्धन करण्यासाठी विशेष अभ्यास प्रकल्पास केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत ‘बीएनएचएस’ तीन वर्षांत स्थलांतरित पक्ष्यांच्या ७७ अधिवासांचा र्सवकष अभ्यास करेल. तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतरण मार्गाच्या संवेदनशीलतेचे नकाशीकरण (बर्ड सेन्सिटिव्हिटी मॅपिंग टूल) आणि त्रिमितीय नकाशीकरण केले जाईल.

देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास प्रकल्प असल्यामुळे पक्षी संवर्धनाबरोबरच विकास प्रकल्पांच्या आखणीमध्ये निर्णय प्रक्रिया अधिक सुकर होईल.

‘पाणथळ जागा आणि स्थलांतरित पक्षी’ या विषयावर ‘बीएनएचएस’मार्फत लोणावळा येथे सुरू असलेल्या पाचदिवसीय (१८ ते २२ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘बीएनएचएस’चे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनावर देश-परदेशातील तज्ज्ञांची व्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत.

अतिथंड प्रदेशातून भारतात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचा मार्ग हा मध्य आशियाई मार्ग (सेंट्रल एशिया फ्लाय वे) म्हणून ओळखला जातो. देशातील बहुतांश भागांचा समावेश यामध्ये होतो. त्याचा र्सवकष अभ्यास होण्याची गरज असल्यामुळे मागील वर्षी हा आराखडा ‘बीएनएचएस’ने केंद्रीय मंत्रालयास सादर केला होता. त्याअंतर्गत मागील आठवडय़ात तीन वर्षांच्या ३.८ कोटी रुपयांच्या प्रकल्पास केंद्रीय वन मंत्रालयाने मान्यता दिली. तीन वर्षांत चार टप्प्यांत हे काम पूर्ण करायचे आहे.

देशातील १७ राज्यांमधील स्थलांतरित पक्ष्यांचे ४६ पाणथळ अधिवास आणि जमिनीवरील ३१ अधिवासांचा या अभ्यासात समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन अधिवास आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास हे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण मानले जाते. त्यांचा सविस्तर अभ्यास केल्यामुळे भविष्यात अधिवास आणि पक्षी संवर्धनास फायदा होईलच, पण त्या अनुषंगाने विकास प्रकल्पांची आखणी करताना पर्यावरणाची हानी रोखण्यास अधिक मदत होईल, असे डॉ. आपटे यांनी सांगितले. शहर नियोजनकार, नागरी विमान वाहतूक, पूल वगैरेसारख्या पायाभूत सुविधा आणि सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या हरित प्रकल्पांचा फटका स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रवासमार्गास बसतो. हा धोका टाळण्यासाठी या अभ्यासाचा फायदा होईल, असेही डॉ. आपटे यांनी स्पष्ट केले.

अभ्यास प्रकल्पांतर्गत देशभरातील स्वयंसेवी संस्था, विविध सरकारी आणि गैरसरकारी यंत्रणांकडून पक्षी स्थलांतरणाच्या नोंदी एकत्र केल्या जातील. प्रकल्पाच्या पहिल्या दोन वर्षांत या नोंदींचे संकलन, त्याचे विश्लेषण केले जाईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात पक्ष्यांच्या प्रवासमार्गाचे संवेदनशीलतेनुसार नकाशीकरण केले जाईल.

प्रगत तंत्राचा वापर

  • आराखडय़ानुसार तिसऱ्या वर्षी प्रगत अशा ऑग्युमेन्टिव्ह तंत्राचा वापर करून प्रवासमार्गाचे त्रिमितीय दृश्य पाहण्याची सुविधा विकसित केली जाईल.
  • बंगळूरुस्थित ‘अक्सेच्युअर लॅब’च्या साहाय्याने हे तंत्र विकसित करण्यात येईल. यामध्ये एखादा पक्ष्याने स्थलांतरासाठी नेमका कोणता मार्ग वापरला ते कळू शकेल.
  • त्या मार्गात कोणते अडथळे आहेत का, तसेच नव्याने विकसित होणाऱ्या सुविधांचा अडथळा होणार आहे का हे तपासता येईल.
  • स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास हे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण मानले जाते. त्यांचा सविस्तर अभ्यास केल्यामुळे भविष्यात अधिवास आणि पक्षी संवर्धनास फायदा होईलच, पण त्या अनुषंगाने विकास प्रकल्पांची आखणी करताना पर्यावरणाची हानी रोखण्यास अधिक मदत होईल.

  – डॉ. दीपक आपटे,संचालक, बीएनएचएस

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Migrant bird trip maps in three years akp
First published on: 19-11-2019 at 02:46 IST